Jyoti Gavate : देशाला महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीने क्रीडा क्षेत्रात अस्सल हिरे दिले आहेत. या हिऱ्यांनी केवळ देशातच नाही तर जगात भारताचं नाव मोठं केलं. परंतु, याच ग्रामीण मातीतील खेळाडूंना राजाश्रय मिळत नाही तेव्हा त्यांच्यात कितीही प्रतिभा असून उपयोग नाही हे परभणीच्या आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवतेच्या संघर्षावरून पाहायला मिळते. 42 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून ज्योतीला नोकरी मिळाली नाही. शिवाय ऑलिम्पिकमध्येही जाता आलं नाही.  


परभणीच्या आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते हिने अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या. 42 स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून तिने दीड एकर जमीन खरेदी केली. याच शेतात राबून तिने आपला सराव कायम ठेवला आहे. नुकत्याच ढाक्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत तिचा दुसरा क्रमांक आला आहे.  ज्योती आपल्या जीवाचे रान करत आहे. परंतु, तिला राज्याचा क्रीडा विभाग आणि अ‍ॅथलेटिक संघटना साथ देत नाहीत. त्यामुळे या गुणी खेळाडूचे मनोबल खचत चालले आहे.


सर्व निकषात बसत असताना अद्याप शासनाने ज्योतीला नोकरी दिलेली नाही. महत्वाचे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे तिचे स्वप्न आहे. त्यात ती यशस्वी होऊ शकेल. परंतु, तिला अद्याप आंतरराष्ट्रीय सरावासाठी भारतीय कॅम्प मिळाला नाही. हे राज्याच्या अ‍ॅथलेटिक संघटनेचे अपयश म्हणावे लागेल.  


कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर ज्योतीची झेप 
वयाच्या 13 व्या वर्षांपासून कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अ‍ॅथलेटिकमध्ये ज्योतीने चांगले यश मिळवले. भारतीय उपखंडातील 42 किलोमीटर अंतराच्या 35 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत 15 वेळा प्रथम, 3 वेळा व्दितीय तर 3 वेळा तृतीय क्रमांक मिळवला आहे. ज्योती आज ऑलिम्पिक स्पर्धेत वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न बघत आहे. परंतु, हे केवळ स्वप्नच राहिल का? अशी भीती तिच्या मनात आहे. कारण 2 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे आणि यासाठी तिला आंतरराष्ट्रीय ट्रेनिंगची गरज आहे. तिचे वडील एसटी महामंडळातून शिपाई पदावरून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ राज्य सेवा परीक्षा देत आहे तर एक पोलीस खात्यात आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने काय करायचं?  हा प्रश्न ज्योती आणि तिच्या कुटुंबासमोर समोर आहे.   


ज्योतीने मिळवलेल्या यशानुसार आणि तिच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीनुसार तिला वर्ग 2 ची नोकरी मिळायला हवी. मात्र तीही अद्याप मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करून क्रीडा विभाग, राज्य शासन यांच्याकडे खेटे मारल्यानंतर ज्योतीला वर्ग 4 ची नोकरी देऊ असे आश्वासन क्रीडा विभागाने दिले. मात्र 2 वर्षे झाली तरीही तिच्या पदरी अद्याप काहीच पडलेले नाही. याच नोकरीच्या प्रस्तावाबाबत क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनाही माहिती नाही. तिने प्रस्ताव नेमका काय पाठवला आणि त्याचे काय झाले? शिवाय अ‍ॅथलेटिक संघटना ज्योतीला मदत करण्यास कमी पडल्याचे मान्य करत आम्हाला राजकीय वलय कमी पडत आहे असे सांगत आहे.  


खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावने हे कोणत्याही खेळाडूचे ध्येय असते. ज्योतीने देखील आपल्या खेळातून हा सन्मान देशाला मिळवून दिला. मात्र तिला काय मिळाले? याचे गणित मांडले तर क्रीडा संघटना आणि शासनाच्या क्रीडा विभागाची उदासीनता समोर येते. ग्रामीण भागातून ज्योती सारख्या गुणवान खेळाडूंचे असेच खच्चीकरण होत राहिले तर नवीन खेळाडू कसे पुढे येतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  
 
सात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश
साऊथ एशियन गेम्स नेपाळ ब्रॉन्झ मेडल,
बागा बंधू शेख मुजीब ढाका मॅरेथॉन सलग दोन वर्षे व्दितीय
पटाया सिटी एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2011 ला सातवा क्रमांक 
साऊथ एशियन गेम्स इंडिया 2016 मध्ये चौथा क्रमांक 
SCO SALT इंडस्ट्री सिटी यूहान चायना 9 वि प्लेस 
न्यू TAIPEI सिटी वॅन जीन शी मॅरेथॉन 8 वा क्रमांक 
सर्व 42 किलोमीटरच्या स्पर्धा    


35 राष्ट्रीय स्पर्धेत यश 
स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये 7 वेळा सहभाग. यात 2 वेळा प्रथम, 4 वेळा द्वितीय तर एकदा तिसरा क्रमांक मिळाला.   
इंदिरा प्राईस मणी अलाहाबाद मॅरेथॉन 2013 ते 2019 डबल हॅट्रिक. 42 किलोमीटरमधील एकमेव भारतीय खेळाडू 


महत्वाच्या बातम्या