नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज भाजपच्या वतीने वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांवर दबाव असून आम्ही कोर्टात जाऊ पण नाना पटोलेंना सोडणार नसल्याचे वक्तव्य चंद्रशेकर बावनकुळे यांनी केले.


 नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भंडारा, नाशिक यानंतर नागपूरमध्ये देखील  नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
 
नाना पटोले यांनी मोदी यांच्याविरोधात भडकावू वक्तव्य केले असलेल्याचे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणे, मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देणे, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे, जमावबंदी असताना जमाव तयार करणे,  समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कोरोना निमांचे पालन न करणे, देशात दंगे होती असे कृत्य करणे, आणि मोदी यांना जीवे मारण्याकरता षडयंत्र तयार करणे  या मुद्यातंगर्त  नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.