मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. मात्र राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

  


प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाराष्ट्रात 12 मार्चपर्यंत 52 लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचं दिसत आहे."






प्रकाश जावडेकरांच्या ट्वीटला उत्तर देतांना जयंत पाटील यांनी म्हटलं की, लसींबाबतची माहिती माझ्याकडे नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जास्त माहिती आहे. मात्र भारतीयांसाठी लसी कमी पडत असताना आम्हाला इतर देशातील नागरिकांची जास्त आहे. आम्ही आमच्या देशातून पाकिस्तानसह इतर देशांना लस निर्यात करण्याचा जो दानशूरपणा दाखवतोय, त्याचं कौतुक करावं लागेल. भारतात आधी लसीकरण व्हायला हवं होतं. भारतातल्या लसीकरणाकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. पण जगाची देखील काळजी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे भारतीय थोडे मागे राहिले तर चालतील, अशी मानसिकता केंद्राची सध्या दिसते, असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तर आपल्या देशात तयार होणारी लस प्रथम भारतीयांना मिळायला हवी, ती का मिळत नाही याचं उत्तर प्रकाश जावडेकर यांनी द्यावं, असंही जयंत पाटलांनी म्हटलं. 


महाराष्ट्रात अधिक लसींचा पुरवठा व्हायला हवा, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत म्हटलं. तर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेतली. राज्यात एक कोटी 77 लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, 45 वर्षावरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना 2 कोटी 20 लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मात्र आठवड्याला 20 लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 


आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या भेटीला; कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी करणार


उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे खास अपील केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे. आनंद महिंद्रा  यांनी सांगितलं आहे की गरजेनुसार कोरोनाची लस देण्यात यावी, त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. यावेळी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी जेणेकरुन कमीत कमी लोकांमध्ये संक्रमण होऊ शकेल. 



Anand Mahindra | पहिल्यांदा गरजूंना कोरोनाची लस द्यावी, आनंद महिंद्रा यांचं राज्य सरकारला आवाहन