Remdesivir Shortage: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र शासनानं सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्रानं यासंबंधीचे निर्देश दिले असून, महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु असा इशाराही दिला आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला.
केंद्रानं ही काय परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे हा थेट सवाल उपस्थित करत, या औषधांच्या विक्रिला परवानगी द्या नाहीतर महाराष्ट्राच्या भूमीवर असणाऱ्या या औषधांच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत एफडीएच्या मंत्र्यांच्या मदतीने पावलं उचलत कारवाई करत कंपन्या सील करु आणि औषधांचा जनतेला पुरवठा करु असा थेट इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबतही केंद्राचा अडथळा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशातील परिस्थितीचा आढावा घेत ही युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला कामाला लावणं अपेक्षित होतं, पण देशाचे पंतप्रधान मात्र निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलावंतांना सवलती देण्यासाठी शासन स्तरावर चर्चा सुरु- अमित देशमुख
आता फतवा काढा, ज्यांना मृत्यू कोरोनामुळं होतोय त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यास उद्यापासून सुरुवात करा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला. देशातील आरोग्यमंत्री बेजबाबदारपणे काम करत असून, मोदींचं याकडे लक्ष नाही. पण, वेळ अजूनही गेलेली नाही, पंतप्रधानांनी यात लक्ष द्यावं. सध्याच्या घडीला होणाऱ्या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर लक्ष द्या, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही लक्ष द्या म्हणत त्यांनी केंद्र शासनाला सतर्कही केलं.
रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु- किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांत असूनही ते मात्र बंगालमध्ये प्रचारात व्यग्र आहेत. यावरुन हेच सिद्ध होत आहे की पंतप्रधानांना देशातील नागरिकांच्या जीवापेक्षा निवडणूक जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली.