मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यामध्ये त्यांनी लस निर्मितीपासून ते वैद्यकीय परीक्षा आणि कलावंतांना दिली जाणारी आर्थिक मदत या मुद्द्यांवरील प्रश्नांची उत्तरं दिली. मागील काही दिवसांपासून किंबहुना वर्षभरापासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कलाविश्वाचं फार नुकसान झालं. पण, राज्य शासन कलावंतांसोबत असून त्यांना सवलती देण्यासाठी शासन स्तरावर चर्चा सुरु असल्याचं देशमुख म्हणाले. 


दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सदर परिस्थितीच्या संदर्भात एक प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला. वर्षभरात सांस्कृतिक खात्यानं मराठी नाटक, लोककला यांच्याशी निगडीत काय निर्णय घेतले? आज बॅकस्टेज वर्कर्स आणि लोककलावंत देशोधडीला लागले आहेत याचा विचार आपलं खातं किंवा एक मंत्री म्हणून तुम्ही करणार आहात का, असा प्रश्न त्यांनी विचारला. 


शिंदे यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अमित देशमुख यांनी काही मुद्दे मांडले. हे संकट अभूतपूर्व होतं. लॉकडाऊन हेच या संकटाचं उत्तर होतं. कारण जीव वाचवणं हीच आपली प्राथमिकता होती. पहिल्या लाटेतून आपण सावरलो. पण, दुसऱ्या लाटेतही लॉकडाऊन करावं लागलं. ही बाब खरी आहे की निर्बंधांमुळे काही क्षेत्रांना अडचणी आल्या. आपण सांस्कृतिक विभागाकडून मराठी चित्रपटांना अनुदान देतो, वृद्ध कलावंतांना मानधन देतो, नाट्य निर्मात्यांना अनुदान देतो. 


रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु- किशोरी पेडणेकर 


ज्या कलाकृतींचं प्रदर्शन झालं नाही, अपेक्षित व्यवसाय न झाल्यामुळं अडचणी उदभवल्या आहेत त्यासाठी या व्यवसायाला उभं करणं ही महाविकासआघाडीची जबाबदारी आहे, असं अमित देशमुख म्हणाले. 


एबीपी माझाच्या वतीनंही मांडण्यात आले होते लोककलावंतांचे प्रश्न 


'कलावंतांशी निगडीत योजना शासनानं कधीही थांबवली नाही. आपण मदत वृद्ध कलावंत मराठी चित्रपट निर्माते, ज्या सवलती द्यायच्या आहेत त्यासंदर्भात धोरण आखायचं आहे. कामकाज सुरु आहे चर्चा आणि बैठका सुरु आहेत. कोरोना महानमारीच्या काळात या क्षेत्राला प्रदीर्घ काळासाठी चालणारी मदत करायची आहे. कलाकारांना आश्वस्त करतो की आम्ही त्यांच्या पाठीशी उभे होते आहोत आणि यापुढेही राहू', असं अमित देशमुख म्हणाले. 


निर्बंध लागू नसते केले तर भयावह अडचणींना तोंड द्यावं लागलं असतं, असं म्हणत नागरिकांमध्ये स्वयंशिस्त अतिशय महत्त्वाची असल्याच्या मतावर त्यांनी जोर दिला. येत्या काळात लसीकरणाचं प्रमाणही वाढवावं लागेल, सोबतच आपण दक्षता राखली तर परिस्थिती सुधारेल आणि भविष्यात निर्बंध लावण्याची शक्यता कमी असेल. पण, तूर्तास बाहेर जाऊन करता येणारी कामं मात्र नाईलाजानं बंद करण्यात आली आहेत याचं स्मरण त्यांनी करुन दिलं. 


लसनिर्मितीमध्ये हाफकिनची उल्लेखनीय कामगिरी 


लसनिर्मितीमध्ये हाफकिनची उल्लेखनीय कामगिरी असल्याची बाब मांडत हाफकिनची 23 कोटी लसनिर्मितीची क्षमता असल्याकडे देशमुख यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रात अधिकाधिक लसनिर्मिती करण्याचा मानस असल्याचं म्हणत निर्माण केल्या जाणाऱ्या लसींमध्ये राज्याचा कोटा असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येत्या वर्षभरामध्ये हाफकिनची ही लस नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी माहितीही त्यांच्या बोलण्यातून मिळाली.


विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नाहीच.... 


वैद्यकिय परीक्षा घेण्याआधी कोरोना स्थितीचा आढावा घेणार असल्याचं म्हणत जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची भूमिका नसल्याचं ते म्हणाले. राज्यात सध्या जाणवणारा रेमडेसिवीरचा पुरवठा लक्षात घेत हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार सतर्क असून, रुग्णसंख्येप्रमाणं रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती त्यांनी देत येत्या काही दिवसांमध्ये हा पुरवठा सुरळीत होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.