Beed: वाळू उपशामुळं खड्डा झालेल्या पाण्यात बुडून (Four Children Drowned) चार मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शहाजहानपूर चकला या ठिकाणी आज (6 फेब्रुवारी) घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. नदीकाठची वाळू काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडतात आणि या खड्ड्यांमध्ये याआधीही अनेक अपघात घडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले नऊ ते बारा वर्षे वयोगटातील आहेत. आज सायंकाळी नदीकाठी खेळायला गेले असता वाळू उपशामुळं तयार झालेल्या खड्ड्यात बुडून या चारही मुलांचा मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यामधून वाहणारी गोदावरी नदी असो की सिंदफना नदी या नदीपात्रामध्ये वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्यामध्ये असे खड्डे करून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण मागच्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत. प्रशासनाचा या वाळू माफियावर वचक नसल्यामुळं असे प्रकार घडताना पाहायला मिळतायेत.
यापूर्वी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला वेळोवेळी कळवून सुद्धा अवैध वाळू उपसा काही केल्या बंद झाला नाही. आता तरी या वाळूमाफियांची इतकी मुजोरी वाढली आहे की, तांदलवादी आणि शहजाणपूर या दोन्ही बाजूनं सिंदफणा नदीत 20-20 फुटाचे खड्डे केलेले पाहायला मिळतायेत.
हे देखील वाचा-
- गांजाची राखण मूकबधिर व्यक्ती करायचा, महिला करायच्या विक्रीचं काम! पाच जणांना बेड्या, दिंडोशी पोलिसांची कारवाई
- Crime News : प्रेयसीच्या मागण्यांना कंटाळलेल्या प्रियकराने केली हत्या; आरोपीला अटक
- फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लोकलमधील प्रवाशांचा मोबाईल खेचणाऱ्या चोरटा जेरबंद, कांदिवली स्थानकातील घटना
LIVE TV | लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी शिवाजी पार्कवर पोहचले.