Lata Mangeshkar Last Rites : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वााजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोदींकडून मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आले. 


प्रभूकुंज निवसस्थानावर दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर लदादीदींचं पार्थिव विशेष लष्करी वाहनातून शिवाजी पार्क येथे आणलं होतं.  त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता लतादीदींची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती. पेडर रोड, हाजी-अली, वरळी नाडा, प्रभादेवी, सिद्धीविनायक मंदीर यामार्गे शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा पोहचली. संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय पार्थिवासोबत होतं. अंत्ययात्रेला चाहत्यांची गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज मान्यवर शिवाजी पार्कवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना अभिवादन केलं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. 






प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला. लतादीदींच्या निधनाने देशात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले.  स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना पीएम मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना लतादीदींकडून नेहमीच आपुलकी मिळाली. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून बोलून पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते. एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी लतादीदींनी पंतप्रधान मोदींकडे वचन मागितले होते की, ते भारताला नेहमी यशाच्या विकासाच्या उंचीवर नेतील.