Maharashtra Flood | पूरग्रस्त जिल्ह्यांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल
पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची दोन पथकं आज दाखल होतं आहेत. राज्यातील भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने 6,813 कोटींच्या मदतीचा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता.

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. पुरात झालेल्या नुकसानीचा आढावा ही पथकं घेणार आहेत.
राज्यातील भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने 6,813 कोटींच्या मदतीचा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाचे दोन भाग असणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा पहिला भाग असेल, त्यासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2 हजार 105 कोटी रुपये, अशाप्रकारे पूरग्रस्तांसाठी एकूण 6 हजार 183 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता.
ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती. त्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं. बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येत असून पशुधन खरेदी, घर बांधकामांसह विविध उपाययोजनांसाठी 6813 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता.
त्यानंतर आज केंद्रीय पथकाकडून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार आहे. या सात सदस्यांमध्ये कृषी विभागाचे आर. पी. सिंग, व्यय विभागाचे चित्तरंजन दास, ऊर्जा विभागाचे ओमकिशोर, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जैसवाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी. राजवेदी आणि जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे. पुढील चार दिवस हे पथक पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
महत्त्वाच्या बातम्या






















