Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राग आल्यानंतर ते काय करतात याचं भन्नाट उत्तर एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात एका चिमुकलीच्या प्रश्नावर दिलंय. एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात फडणवीसांनी मुलांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुकलीने, तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, मला राग येतच नाही, फक्त भूक लागल्यानंतर मला राग येतो. कोणी पटकन खायला दिलं की माझा राग शांत होतो. त्यामुळं माझ्या रागावरचा उपाय हा मला काहीतरी खायला देणं हा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी यांनी यावेळी सांगितलं.
एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. शाळेत असताना तुम्ही दंगा मस्ती कारायचा का असा प्रश्न एका चिमुकल्याने फडणवीस यांना विचारला. यावर ते म्हणाले, "माझ्यासोबत शिकलेले आणि ज्यांनी मला शिकवलं त्या शिक्षकांना आज आश्चर्य वाटतं की मी राजकारणात आहे. मी खूप शांत विद्यार्थी होतो. कोणतीच खोडी करत नसे आणि केलीच तर ती कोणाला समजत नव्हती. कारण मी शाळेत गडबड न करणारा, शांत, हुशार विद्यार्थी अशी ओळख होती, असे फडणवीस यांनी सांगितले. पण शाळेच्या काळात थोडी गडबड, बदमाशी करावीच असे त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांना शाळेत असताना एकदा शिक्षा देखील झाली होती. याबाबत त्यांनी सांगितले की, "एकदा आमच्या युनीट टेस्टमध्ये 17 विद्यार्थ्यांना गणितात शून्य गूण मिळाले. त्यावेळी शिक्षकांनी आम्हा 17 जणांना एक-एक छडी मारली आणि ते वर्गात आले की पुढच्या युनीट टेस्टपर्यंत आम्हाला सर्वांना फळ्याच्या खाली बसवायचे. पण यामुळे पुढच्या टेस्टमध्ये आम्ही सर्व जण पास झालो."
शाळेत असताना देवेंद्र फडणवीस यांना नाटकांमध्ये काम करण्यास खूप आवडत असे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय अनेक गाणी देखील त्यावेळी पाठ होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडतं. ऐतिहासिक गोष्टींमध्ये मी रमून जातो, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या