Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह खायचे असं त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं आणि एकच चर्चा सुरु झाली. मग यावर देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात मला पुरणपोळी आवडत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी देऊ नका, असंही म्हटलं. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळीचा किस्सा एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात समोर आलाय.


एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात मुलांनी फडणवीसांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुरड्याने 'तुम्हाला गोडात सर्वात जास्त काय आवडतं?' असा प्रश्न फडणवीसांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, की 'मी पहिलंच सांगतो की मला पुरणपोळी आवडत नाही, माझ्या बायकोच्या एका उत्तरामुळे अनेक लोकांचा समज झालाय की मला पुरणपोळी आवडते. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी लोक मला पुरणपोळीच देतात' असं देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितलं आणि उपस्थित चिमुरडे हसू रोखू शकले नाहीत.





 
हा कार्यक्रम आज, 13 नोव्हेंबर रोजी  संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे. या कार्यक्रमात चिमुरड्यांनी देवेंद्र फडणवीसांना विविध विषयांवर प्रश्न विचारले आहेत. त्यावर फडणवीसांनी देखील दिलखुलास उत्तरं दिली आहेत. 
 
पुरणपोळी आणि फडणवीस... नेमका काय आहे किस्सा...


काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर ते लग्नापूर्वी 30 ते 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं होतं.  त्यानंतर सोशल मीडियावर यावर बरीच चर्चा रंगली. त्यानंतर एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांसमोर यावर स्पष्टीकरण दिलं होतं.  मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत असं वैतागून देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, ''आमचं जन्मात कधी भांडण झालं नाही. मात्र, आता सगळीकडे लोक त्यांना पुरणपोळी देतात, मग ते घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल की, देवेंद्र यांच्या लहानपणीचे एक मित्र आहेत. त्यांनी लग्नाआधी मला सांगितलं होत की, देवेंद्र यांनी एका स्पर्धेत, लग्नाच्या पंक्तीत 30 ते 35 पोळ्या खाल्या आणि ते जिंकले. मात्र लग्नानंतर माझ्यासमोर त्यांनी अर्धी पूणपोळी देखील खाली नसल्याचे अमृता फडणवीसांनी नंतर सांगितलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, एबीपी माझावरुन मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी नको.