Maharashtra Weekend Lockdown | सिंधुदुर्गात सर्व आस्थापना बंद, सर्वत्र शुकशुकाट
Maharashtra Corona Weekend Lockdown : राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन सुरु झाला असून यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील परंतु कोणालाही कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने दोन दिवसाचा वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या वीकेण्ड लॉकडाऊनची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व आस्थापना बंद ठेऊन नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चौकचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच कामाशिवाय घराबाहेर निघालेल्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्या प्रशासन आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासियांना घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वीकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मुंबईत लॉकडाऊनमुळे दारुच्या विक्रीला बंदी आहे. मात्र तरीही तळीराम वाईन शॉपबाहेर रांगा लावत आहेत. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असल्फा इथल्या साईनाथ वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमी दारु घेण्यासाठी हजेरी लावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी शटर बंद असले तरी इतर मार्गाने दारु मिळत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी विभागातून मद्यप्रेमी जमा होत आहेत. मात्र वाईन शॉप मालकाने गर्दी होत असल्याने दुकान बंद केलं. तर आम्ही इथेच राहतो, घरं लहान आहेत म्हणून इथे आलो आहे, अशी विचित्र कारणं तळीराम सांगत आहेत.
अमरावतीत 5 हजार कोवॅक्सिंग लस पोहचलेली आहे. अमरावती जिल्ह्यात जवळपास 40 ते 45 लसीचे केंद्र बंद झाले असून इतर 100 केंद्रावर लसी देणं सुरू आहे. आज, उद्या आणि परवा दुपार पर्यंत पुरेल इतका साठा सध्या उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
रुग्णालयात जास्तीच्या ऑक्सिजन बेडची तरतूद सुरु. ज्याला गरज आहे, त्यांना बेड मिळालेच पाहिजेत या हेतूनं बॉम्बे हॉस्पिटलला दिली भेट
पालघर जिल्ह्यात दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे . पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू सारख्या मोठ्या शहरात सध्या बाजारपेठा कडकडीत बंद असून या ठिकाणी तपासणी नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसंच दोन दिवसाच्या टाळेबंदीत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे
पालघर जिल्ह्यातही दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे . पालघर जिल्ह्यातील पालघर , बोईसर , डहाणू सारख्या मोठ्या शहरात सध्या बाजारपेठा कडकडीत बंद असून ठिकाणी तपासणी नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . त्यामुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून ठराविक येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे . तसंच दोन दिवसाच्या टाळेबंदीत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे
राज्यासह मुंबईतही लागू असणाऱ्या लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी खुद्द रस्त्यावर येत परिस्थितीचा आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यात या वीकण्ड लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील बाजार पेठेत व रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचा नांदेडकरांनी फज्जा उडवल्याचं चित्र आहे.
साताऱ्यात वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील रस्ते ओस पडले असून पोलिसांकडून नाक्यानाक्यावर तपासणी सुरु आहे. घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. तर सर्व दुकाने बंद आहेत.
राज्यात कडक लॉकडाऊन असताना देखील आज मुंबईतील दादरचं फूल मार्केट सुरु आहे. याबाबत व्यापाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी माहिती दिली की, "दोन दिवसांवर हिंदू नववर्षाची सुरुवात करणारा सण गुढीपाडवा आहे. या सणासाठी तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कर्ज काढून झेंडूच्या फुलाचं पीक घेतलेलं असतं. आज जर ही फुलं विकली गेली नाहीत तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागेल. कारण फुलं नाशवंत असतात." सध्या मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये केवळ फुलांची पार्सल विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येत आहेत.
आज आणि उद्या या दोन दिवशी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मुंबई मेट्रो 1 वर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करतात. आज सर्वसामान्यांना देखील मेट्रोने प्रवास करण्याची मुभा असली तरी मुंबईत नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळल्याचे दिसत आहे. मेट्रो स्थानकांवर अगदी तुरळक प्रवासी दिसून येत आहेत.
ठाण्यातील रस्त्यावर आज शुकशुकाट बघायला मिळत आहे. ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तलावपाली, चिंतामणी चौकसारखा परिसर आज शांत आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद दिला आहे.
ठाण्यातले सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणजे जांभळी नाका येथील मार्केट परिसर. मात्र आज सर्व मार्केट बंद ठेवण्यात आलेले आहेत. स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद आहेत. मुख्य भाजी मंडई बंद आहे. तर धान्य मार्केट देखील बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत.
ठाणे जिल्ह्यात पोलीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसून येत आहेत. कापूरबावडीसारख्या जंक्शनवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. भिवंडी आणि घोडबंदर रोडवरुन येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी पोलीस करत आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना पुढे ठाण्यात पाठवले जात आहे. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पुन्हा घरी पाठवले जात आहे.
कोल्हापूर शहरामध्ये वीकेण्ड लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे. कोल्हापूर शहराच्या चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला उत्स्फुर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या चौकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात असलेला शुकशुकाट ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केला आहे तौफिक मिरशिकारी यांनी.
आजपासून दोन दिवसीय कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र याबाबत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचं सध्या चित्र पाहिला मिळत आहे. दादर मार्केटमध्ये आजही नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे. याबाबत बोलताना छोटे व्यापारी म्हणाले की, "मागील एक वर्ष लॉकडाऊन होतं. त्यामुळे आर्थिक कमाई काहीच नाही त्यामुळे कुटुंब चालवणं मुश्किल झालं आहे." लॉकडाऊन लावा परंतु आमच्याबाबत काहीतरी निर्णय घ्या असा देखील सूर व्यापाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
आजपासून दोन दिवसीय कडक लॉकडाऊनला मुंबईत सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत राज्यात पाठ दिवस कडक निर्बंध आणि शनिवार, रविवार वीकेण्ड लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेल नाहीत, त्यामुळे अजूनही बेस्टने नागरिक प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरुन नागरिकांमध्ये अजूनही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध आणखीच कठोर केले आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानही बंद राहणार आहेत. तसंच नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. कल्याण-डोंबिवली शहरात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. काल रात्रीपासूनच लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेसह महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर तूरळक रहदारी दिसून येत आहे. मात्र काही नागरिकांना मॉर्निंग वॉकचा मोह काही आवरता आलेला नाही. कल्याणचा काळा तलाव बंद करुनही या परिसरात नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावली आहे. तलाव बंद असताना चक्क गेटवरुन उड्या मारत या ठिकाणी नागरिक जात होते. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती दिवसागणिक भयावह होत आहे. काल दिवसभरात 2000 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उपचारासाठी बेडची देखील कमतरता भासत आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासन, महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्यही तितकेच गरजेचं आहे.
मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरात वीकेण्ड लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यात येत आहे. शुक्रवारच्या रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त असून, प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त नागरिकांनी, आपले वाहन घेऊन घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आलं आहे. मिरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर या वीकेण्ड लॉकडाऊन ला नागरिकांनीही सहकार्य करणं गरजेचं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Weekend Lockdown : कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शुक्रवार (9 एप्रिल) रात्री 8 ते सोमवार (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद? त्यावर नजर टाकूया.
काय सुरु, काय बंद?
- डी मार्ट, बिग बाजार, रिलायन्स मॉल किंवा सुपरमार्केट सुरु राहणार का?
एकाच ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतरही वस्तू विकल्या जात असतील तर अशी दुकाने, मॉल्स, सुपरमार्केट बंद राहतील. - लॉकडाऊनच्या काळात काय सुरु, काय बंद?
अत्यावश्यक सेवा सर्व सुरु राहतील. मात्र, कोणालाही कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. - विकेंड लॉकडाऊन दरम्यान बाजार समित्या सुरु राहणार का?
हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात. बाजारात जास्त गर्दी होत असल्याचे दिसल्यास ते बंद करु शकतील. - बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारे दुकाने चालू राहणार का?
नाही - गॅरेज, ट्रान्सपोर्ट सेवा, अटोमोबाईल स्पेअर पार्ट विकणारी शॉप्स सुरु राहणार का?
वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. - केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात का?
नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील. - दारु विक्रीची दुकाने उघडी राहणार का?
नाही. - रस्त्याच्याकडेचे ढाबे उघडे राहणार का?
हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात. - इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?
नाही. - दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील?
नाही. - आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?
हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी 7ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात - आठवड्याच्या शेवटी रात्री 8 नंतर किंवा सकाळी 7 च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करु शकतात का?
आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (वीकेण्ड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाहीत. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -