कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोल्हापूर उत्तरचा तिढा आता सुटला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आधी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांच्या विरोधामुळे त्या ठिकाणी त्यांचे नाव मागे घेण्यात आले आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यावर राजेश लाटकर हे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरला.
मधुरिमाराजेंचा अर्ज मागे
दरम्यानच्या काळात राजेश लाटकर यांनी दोन वेळा शाहू महाराजांची भेट घेतली आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. राजेश लाटकर यांच्या वडिलांनीही शाहू महाराजांकडे तशी मागणी केली. त्यामुळे शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांच्या अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजेश लाटकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शाहू महाराजांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मधुरिमाराजे छत्रपती या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांच्या माघारीनंतर कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार राहिला नाही. तर राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं.
राजेश लाटकरांच्या नावाची घोषणा
कोल्हापुरातील तिढा सोडवण्यासाठी सतेज पाटील, शाहू महाराज प्रयत्न करत होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आलं असून राजेश लाटकर यांना काँग्रेसने पुरस्कृत उमेदवार जाहीर केलं आणि त्यांना पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार
मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापुरात अभूतपूर्व राडा झाला. काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले होते. त्यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. या सर्व प्रकरणावर स्वतः शाहू महाराजांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच मधुरिमाराजेंचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणं मान्य नव्हतं. एकाच कुटुंबात दोन पदं नकोत ही आमची पहिल्यापासून भूमिका होती. राजेश लाटकर यांनी माघार घेतली तरच निवडणूक लढवायची असं ठरलं होतं. काँग्रेस पक्षाची गरज म्हणूनच मधुरिमाराजेंनी उमेदवारी स्वीकारली होती. राजेश लाटकर हे काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करु.
सतेज पाटलांवर शाहू महाराज काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते सतेज पाटील भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर शाहू महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सतेज पाटलांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला असा कांगावा विरोधक करत आहेत. पण त्यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला नाही. मधुरिमाराजेंनंतर मी खासदारकीचा राजीनामा देणार अशी सोशल मीडियात अफवा पसरली आहे. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
ही बातमी वाचा: