ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणे सोबतच पोलिसांच्या संयुक्त गस्त पथकाच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात आहे.सोमवारी सायंकाळी एका वाहनाच्या तपासणीत बँक एटीएम व्हॅनवर कारवाई करून 2 कोटी 30 लाख 17 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भिवंडी (Bhiwandi) पूर्व विधानसभा मतदारसंघात नारपोली पोलिस ठाणे हद्दीत पोलिस पथक धामणकर नाका उड्डाणपूला खाली वाहनांची तपासणी करीत होते.या दरम्यान बँक एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या CMS कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. व्हॅनमधील रोख रक्कमेबाबत व्हॅनमधील कर्मचारी कोणताही कागदोपत्री तपशील अथवा पैशांचे विवरण पुरावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, पोलिसांनी (Police) या रकमेबाबत भरारी पथकाला माहिती दिली होती, त्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.  


निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर, सोमवारी रात्री भिवंडीमध्ये एटीएम पैसे वाहतूक कारची तपासणी केली असता, 2 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलाखाली आढळून आलेल्या रकमेबाबत संबंधितांना पुरावे व रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नाही. याबाबत माहिती भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी दिल्यानंतर त्यांच्या निर्देशानंतर निवडणूक आचार संहिता नोडल अधिकारी भरारी पथकाने सदरची रक्कम तपासणी करून जप्त करत ही रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. आयकर निरीक्षक पवन कौशिक हे अधिक तपास अहवाल सादर करणार आहेत, त्यानंतर पुढील कारवाई होईल. 


अहिल्यानगरमध्ये 23 कोटींचे दागिने जप्त


दरम्यान, मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी चालले होते. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची चौकशी केली. याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  


हेही वाचा


कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल