मुंबई : डिसेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचं लक्ष ठेवणाऱ्या महाराष्ट्राचं स्वप्न भंगणार असंच दिसतंय कारण राज्यात अद्यापही 14 टक्के नागरिकांनी म्हणजेच 1 कोटी 26 लाख जणांनी अद्याप कोरोनाची एकही लस घेतली नाही.


राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी अवघ्या चार जिल्ह्यात हे लक्ष्य गाठलं जाणार आहे. पुणे आणि मुंबईत 100 टक्के पहिला डोस देऊन झाला आहे. तर भंडारा आणि सिंधुदुर्गात 100 टक्के लसीकरणाचं लक्ष्य दृष्टीक्षेपात आहे. इथे जवळपास 96 टक्के लसीकरण पूर्ण झालंय. मात्र इतर जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठणं शक्य दिसत नाहीये. राज्यातले 22 जिल्हे तर सरासरीच्याही खाली आहेत. राज्यातले 9 कोटी 14  लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. राज्यात एकूण 12 कोटी 77 लाख डोस देण्यात आले आहेत. त्यातील 7 कोटी 87 लाख जणांना पहिला डोस तर 4 कोटी 89 लाख जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.


सध्या केवळ मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मुंबईत 106 टक्के आणि पुण्यात 103 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. भंडारा आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे 100 टक्के पहिला डोस देण्याचे लक्ष्य वर्षा अखेरीस गाठण्याचे शक्यता आहे. मात्र, इतर 32  जिल्हे हे अजूनही   100 टक्के लसीकरणाच्या उद्दीष्टापासून बरेच लांब आहेत.


गेली दोन वर्षे आपण कोविडच्या संकटाशी दोन हात करत आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्ववूमीवर हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. लसीकरण हे एकमेव शस्त्र हाताशी असतांना त्या शस्त्राचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करणे गरजेचं आहे. 


राज्यात सोमवारी  544 नव्या कोरोनाबाधितांची भर


कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज   544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 515  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 98  हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.  राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 81 हजार 661 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 877 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :