Maharashtra Corona LIVE Updates | रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर शरद पवार यांची नाराजी

Maharashtra Corona cases Updates : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. राज्यातील संचारबंदी आणि कोरोना संसर्गासंबंधित सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2021 06:30 AM
अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार, तर सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.


 





तन्मय फडणवीस हे नक्की कोण..? फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, राजेश टोपे उत्तर द्या : शालिनी ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तन्मय फडणवीस यांनी घेतलेल्या लसीमुळे प्रश्न उपस्थित केले आहेत. शालिनी ठाकरे यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्वीट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 





संचारबंदी असतानाही आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पक्ष प्रवेश घेतला

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पक्ष प्रवेश घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये जानवली गावात शिवसेनेने भाजपचे जानवली गावचे सरपंच शिवराम राणे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रवेश करणाऱ्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. राज्यात संचारबंदी असताना देखील मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मात्र पक्ष प्रवेश करुन संचारबंदीचे नियम मोडताना दिसत आहेत. पक्ष प्रवेश केला तो केला त्यात कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवलाच मात्र काहींनी मास्कही काढला. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या आमदारांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. 

रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन शरद पवार यांची नाराजी

ब्रूक फार्मा प्रकरणावरुन शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "ही वेळ राजकारण करण्याची नाही. लोकांना याच्याशी देणं-घेणं नाही. लोकांना इंजेक्शन मिळाले का, उपचार झाले का हे महत्त्वाचे आहे. या विषयावर राजकारण नको," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. गेल्याच आठवड्यात एक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीला बोलवलं होतं यावरुन सरकारविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद रंगला होता. 

दिवसाला 70-75 हजारपर्यंत रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल : डॉ. राजेंद्र शिंगणे

दिवसाला 70-75 हजारपर्यंत रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसंच 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असंही ते म्हणाले. राजेंद्र शिंगणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना ते म्हणाले की, "राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत त्यांनी माहिती घेतली. तसंच लसीबाबत देखील चर्चा झाली." 

पुणे मार्केटयार्ड शनिवार, रविवार राहणार बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पुणे : मार्केटयार्डमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील किराणा, भाजीपाला, फळविभाग शनिवार रविवार बंद ठेवून इतर दिवस 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलाय, यानुसार पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये फळे भाजीपाला व्यापार दिवसाआड सुरु राहणार आहे. मार्केटयार्ड मध्ये खरेदी आणि विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील गाळे दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून संवेदनशील राज्यात गोव्याचा समावेश, 6 संवेदनशील राज्याची यादी जाहीर

राज्य सरकारने 6 संवेदनशील राज्याची यादी जाहीर केली असून यात दिल्ली, केरळ, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि गोवा राज्याचा समावेश आहे या राज्यातून येणाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाने कोरोना रूग्ण वाढीचा वेग थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी गोवा राज्य असून ते संवेदनशील राज्य आहे. गोव्यातून महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची केली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची यंत्रणा त्याठिकाणी नसल्याचं निदर्शनास आले. याशिवाय आता खारेपाटण, फोंडा, आंबोली याठिकाणी सुध्दा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली जाणार आहे.

अदर पुनावाला यांनी मानले पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार
भारतातील लस उद्योगाच्या वतीने मी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी आर्थिक मदत देत निर्णायक धोरणात बदल केले, ज्यामुळं लस उत्पादन आणि वितरणात मदत होणार आहे.





तळोजा - आबानंद वृद्धाश्रमातील 56 जण कोरोनाबाधित

तळोजा - आबानंद वृद्धाश्रमातील 56 जण कोरोनाबाधित, 14 जण गंभीर तर दोन वृद्धांचा मृत्यू 

प्रवाश्यांना कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

प्रवाश्यांना कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय. बेड्या ठोकलेले चौघे हे ट्रॅव्हल्स एजंट आहेत. ते ज्यांना निगेटिव्ह रिपोर्ट हवा असेल त्यांच्याकडून 600 ते 1000 रुपये स्वीकारायचे. यासाठी एका खाजगी लॅबचे लेटर हेड आणि डॉक्टरच्या नावाचे शिक्के बनवून घेतले होते. बेंगलोर-मुंबई महामार्गावरील वाकडच्या भूमकर चौकालगत हा प्रकार सुरू होता. तेंव्हा हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून ह्यांच बिंग फोडलं.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कायम

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कायम. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 41 हजारावर पोहचली. जिल्ह्यात 41हजार 155 जणांवर उपचार सुरू. गेल्या 24 तासात  जिल्ह्यात 6 हजार 845 नव्या रुग्णांची भर तर शहरात 3,870 नवे रुग्ण. जिल्ह्यात 40  रुग्णांचे मृत्यू 


 

चिकन आणि अंडीची मागणी वाढली, दरही वधारले

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सगळे जण प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यात एरव्ही अंडी कमी खाल्ली जातात, मात्र कोरोना झालेल्या रुग्णापासून नातेवाईकांपर्यंत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वसामान्य सुद्धा आपल्या आहारात अंडी आणि मटणाचा समावेश करत आहेत. त्यामुळे पोल्ट्री कोंबडीच्या अंड्याचा भाव 50 पैसे ते एक रुपयाने वधारला आहे तर गावरान अंड्याचा भाव मात्र 2 ते 5 रुपयांपर्यंत वाढला आहे. कोरोना संसर्गाने राज्यात कहर केला आहे. प्रतिकारशक्ती वाढवणे, आनंदी राहणे, इच्छाशक्ती, नियमित व्यायाम यांसह मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सातत्याने हात धुणे यामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना अंडी दिली जातात. असे रुग्ण लवकर बरे होत असल्याने ऐन उन्हाळ्यातही अंडी, चिकनची विक्री वाढली असून, दरवाढही झाली आहे. याबरोबरच घरोघरी फळे, खजूर आणि सुकामेवा दिसू लागला आहे.

पोलीस बंदोबस्त तरीही मुंबईच्या दादर मार्केटमधील गर्दी ओसरेना!

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गडद होत आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, बेड्सची उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. असं असताना देखील नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये गर्दी केली जात असल्याचं चित्र आहे. दादरच्या भाजी मंडईत दररोजच गर्दी पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन व्हावं म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत तरीही देखील कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे.

अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, नातेवाईक मृताचे पाय धुवून पाणीही प्यायले

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यासाठी 25 आणि अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक असाच प्रकार उघडकीस आला. एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. तसेच अंत्यविधी करताना नातेवाईक मयत व्यक्तीचे पाय धुवून पाणीही प्यायले. या संपूर्ण घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर डोली कागल पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून जर कोणी लग्न सोहळा दाखवा अंत्यसंस्कार करत असतील तर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून संबंधितावर कारवाई करतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती 

राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा 21 एप्रिलनंतर सुरळीत होईल. तसेच भविष्यात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाणा येथे दिली. राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मात्र आपण कर्नाटक, आंधप्रदेश, गुजरात इथून ऑक्सिजन घेत आहोत. पुढे रुग्ण असेच वाढत राहिले तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यासाठी आजच मंजुरी दिली आहे त्यामुळे आपली ऑक्सिजनची गरज भागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहेकर आणि सिंदखेडराजा इथे या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांटसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची गरज भागणार आहे, असं डॉ. शिंगणे यांनी सांगितले. 

सोलापूर होटगी रोड विमानतळ परिसरात भीषण आग

 


सोलापूर होटगी रोड विमानतळ परिसरात रात्री 11.30 च्या भीषण  आग लागली आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.  विमानसेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात परिसरात गवत असून त्यामुळे आग पसरत आहे.  मागील वर्षी देखील अशाच पद्धतीने आग लागली होती.

रायगड : सोन्याचे बनावट शिक्के विकून सुमारे ६५ लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

रायगड : सोन्याचे बनावट शिक्के विकून सुमारे ६५ लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी गजाआड, गुजरात आणि ठाणे येथून चार आरोपींना अटक, सुमारे ६५ लाख रुपयांची  रोकड जप्त करण्यात पोलीसांना यश, आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश, रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई,  मुंबई , नाशिक, वर्धा, नागपूर , मध्यप्रदेश , गुजरात, राजस्थान येथे गुन्हे केल्याची कबुली....

पश्चिम बंगालमध्ये यापुढे मोठी सभा करणार नाही भाजपची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये यापुढे मोठी सभा करणार नाही भाजपची घोषणा,


जास्तीत जास्त 500 नागरिकांच्या उपस्थितीतच सभा होणार, तीही खुल्या मैदानातच,


राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ भाजपकडून ही प्रचाराबाबत निर्णय

सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या पत्नी ज्योती मिलिंद शिंदे यांचे निधन
सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या पत्नी ज्योती मिलिंद शिंदे यांचे वयाच्या ५४व्या वर्षी सोमवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले आहे.

गेल्या सहा दिवसांपूर्वी मिलिंद आणि ज्योती या दांपत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ दुर्गाडी जवळील एका खाजगी कोवीड रुग्णालयातील एकाच वॉर्ड मध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ज्योती यांचे कालच रेमडीसेव्हर इंजेक्शनचे ६ डोस पूर्ण झाले होते . परंतु आज पहाटे ५ चे दरम्यान औषधोपचार चालु असतांनाच त्यांची प्राण ज्योत मालवली.

सध्या याच रुग्णालयात मिलिंद शिंदे यांचेवरही औषधोपचार चालु असुन त्यांनाही आजपर्यंत रेमडीसेव्हरचे ४ डोस देण्यात आले आहेत.

दिवंगत ज्योती शिंदे यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमित मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्यात आले.

यावेळी नुकतेच कोरोनातुन मुक्त झालेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.

ज्योती शिंदे यांच्या पश्चात पती मिलींद शिंदे, अंकूश, मयुर ही दोन विवाहीत मुले, दोन सुना, तर अविवाहीत मुलगा मधुर आणि अविवाहीत मुलगी स्वरांजली, असा परिवार आहे.
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याची केंद्राची परवानगी

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याची केंद्राची परवानगी

मोठी बातमी... 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला केंद्राची परवानगी

 Corona LIVE Updates : मोठी बातमी... 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला केंद्राची परवानगी
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-corona-live-updates-covid-19-lockdown-news-covid-19-vaccination-update-coronavirus-cases-mumbai-nagpur-nashik-aurangabad-pune-maharashtra-curfew-982858

अहमदनगर : शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात गेली

शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागरे यांचा अपघात, गाडी थेट रस्त्याच्या खाली ओढ्यात गेली, अहमदनगरहून शेवगावकडे येत असताना माका या गावानजीक अपघात झाला, तहसीलदार अर्चना पागरे सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे,  उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे, स्वतः गाडी चालवत असताना नजरचुकीने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती...

लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी सीरमला 3000 कोटी तर भारत बायोटेकला 1500 कोटींची तात्काळ मदत देण्यास तत्वत: मान्यता - सूत्र

लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी सीरमला 3000 कोटी तर भारत बायोटेकला 1500 कोटींची तात्काळ मदत देण्यास तत्वत: मान्यता - सूत्र

रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिकेची सेवा

रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिकेची सेवा, पेण येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या सामाजिक संस्थेमार्फत मोफत रुग्णवाहिका, रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण 

उद्योजक राजेंद्र गायकवाड यांचे कोरोनामुळे खाजगी रुग्णालयात निधन

पुण्यातील उद्योजक राजेंद्र गायकवाड यांचे कोरोनामुळे खाजगी रुग्णालयात निधन. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र गायकवाड हे पुण्याजवळील वढू गावात समाधी असलेल्या गोविंद गोपाळ यांचे वंशज होते. वढू आणि कोरेगाव भीमा परिसरात शांतता आणि सलोख्याचा वातावरण रहावं यासाठी ते पोलिस आणि प्रशासनासोबत नेहमी प्रयत्नशील राहिले.

विखे परिवाराच्या वतीने जिल्हयासाठी 300 रेमडेसिविर  इंजेक्शन
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने विखे परिवाराच्या वतीने जिल्हयासाठी 300 रेमडेसिविर  इंजेक्शन पुरवण्यात आले...भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेंच्या प्रयत्नातून शिर्डी संस्थानच्या कोविड रुग्णालयाला 100, नगर सिव्हिलला 100 आणि प्रवरा हॉस्पिटलला 100 रेमडेसिव्हीर विनामूल्य देण्यात आले.गरजू रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.

 
भाजपला राज्यातल्या घराघरात कोरोना मृत्यूच थैमान बघायचं, शिवसेनेच्या अर्जन खोतकर यांची टीका

भाजपला राज्यातल्या घराघरात कोरोना मृत्यूच थैमान बघायचं आहे. म्हणून केंद्राकडुन राज्याची कोंडी केली जात असल्याचा घणाघात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलाय. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत भाजप घाणेरडे राजकारण करतंय. यावेळी त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करायलं हवं होतं. मात्र त्यांना माणसं मेलेली बघायची आहे आणि त्यानंतरच ते शांत बसतील, अशी जहरी टीका खोतकरांनी केलीय. 

राज्य सरकारने नागपूरला किती रेमडेसिवीर दिले, नागपूरसाठी काय तरतूद? : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

राज्य शासनाने नागपूरसाठी नक्की किती रेमडेसिवीर दिल्या आहेत आणि नागपूरसाठी काय तरतूद आहे हे स्पष्ट सांगावं. तसंच केंद्राने महाराष्ट्रासाठी नक्की काय तरतूद केली आहे हे सुद्धा कोर्टात सादर करावं, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे. दरम्यान कोर्टातील सुनावणी अद्यापही सुरु आहे.

लसीअभावी मुंबईतील 35 हून अधिक खासगी लसीकरण केंद्रे बंद

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीर औषध मिळत नाही. अशातच लसींचा साठाही संपत चालला आहे. लसींच्याअभावी मुंबईतील 35 हून अधिक खाजगी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालय हे त्यापैकीच एक. सोमवारी सकाळी काही जण इथे गेल्या आठवड्याप्रमाणे लसीकरण सुरु असेल या अपेक्षेने आली होती. मात्र मुख्य प्रवेशद्वारावर लस संपल्याचा बोर्ड पाहून त्यांना आल्या पावली परतावं लागलं आहे.

नाशिक शहरात जनता कर्फ्यू; सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, व्यापारी संघटनांचा पुढाकार

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी पुढे आले असून नाशिक शहरात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. किराणा दुकान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेतच सुरु राहणार असून दूध विक्री सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचं आवाहन नाशिक सिटीझन फोरम आणि इतर संघटनांनी केलं आहे. तर सातपूर विभागात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू

अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला निर्बंध घालण्यासाठी आता कडक निर्बंध लागू केले आहेत. सकाळी 7 ते 11 याच वेळेत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. 11 नंतर मेडिकल वगळता सर्व बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसात अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

वाशिमच्या पोहरादेवी इथली रामनवमी यात्रा रद्द, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे रामनवमीनिमित्त यात्रा असते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी रामनवमी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पोहरादेवी इथे बंजारा भाविक दाखल होऊ नये यासाठी वाशिम प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. पोलिसांनी सगळे रस्ते, सीमा बंद केल्या आहे. पोहरादेवी आणि उमरी परिसरात प्रवेश बंदी घातली आहे. भाविक दाखल होऊन कोरोना संसर्ग वाढू नये याकरता पोलिसांनी खबरदारी म्हणून या उपाययोजना केल्या आहेत. 

दादर भाजी मार्केटमधील गर्दी ओसरेना, पोलिसांच्या आवाहनाकडेही कानाडोळा

मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज सकाळीही भाजी घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. गर्दीमधील अनेक जण मास्क न वापरता आणि सोशल डिस्टन्स न पाळता पाहायला मिळत आहेत. सध्या इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दी कमी करा, सुरक्षित अंतर पाळा, मास्क वापर असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जात आहे. मात्र दुकानदार आणि ग्राहक याकडे कानाडोळा करत आहेत. 

अकोला शहरात अवैधरित्या कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन रुग्णालयांवर महापालिकेकडून 10 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई

अकोला शहरात अवैधरित्‍या कोविड रुग्‍णांवर उपचार करणाऱ्या तीन रुग्णालयांवर महापालिका प्रशासनाद्वारे 10 लाख रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्यात आली आहे. अकोला मनपा क्षेत्रातील राम नगर इथल्या डॉ.नरेंद्र सरोदे, श्वास हॉस्‍पिटल तसंच कौलखेड इथल्या डॉ.स्‍वप्‍नील प्रकाशराव देशमुख, 'फिनिक्‍स हॉस्‍पिटल' आणि महाजनी प्‍लॉट येथील डॉ.सागर थोटे, थोटे हॉस्‍पिटल आण चेस्‍ट क्लिनिक यांच्‍याकडे अकोल्याच्या जिल्‍हास्‍तरीय सुकाणु समितीने तपासणी केली. यावेळी डॉ.थोटे यांनी दुसऱ्या ठिकाणी अनाधिकृतरित्‍या कोविड केअर सेंटर सुरु करुन 13 कोविड संशयित रुग्‍णांना भरती केलं आणि नियमांचे उल्‍लंघन करत त्‍यांना रेमडिसीवीरचे इंजेक्‍शन दिल्याचं आढळून आले. त्यामुळे त्‍यांच्‍यावर Disaster Management Act, 2005 चे नियम 51 (ब) व 53 नुसार तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे.

बुलढाण्यातील पोलीस अधिकाऱ्याकडून नियम न पाळणारे नागरिक आणि त्यांना सोडवण्यासाठी कॉल करणाऱ्या नेत्यांची कानउघाडणी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले, संचारबंदी लावली पण नागरिक काही केल्या त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. कोरोनाविषयक नियम गांभीर्याने न घेणाऱ्या नागरिकांची आणि त्यांना सोडवण्यासाठी कॉल करणाऱ्या नेत्यांची बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोले यांनी चांगलीच कानउघाडणी केली. यापुढे जर कोणी ऐकलं नाही तर बदडून काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. यापुढे नियम मोडणाऱ्याला सोडवण्यासाठी जर नेत्याचा फोन आला तर अपमानच होईल, असंही ते म्हणाले. गावकरी व पोलिसांच्या बैठकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे असून या पोलीस अधिकाऱ्याची स्तुती देखील होत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितिचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्या बद्दल एक हजार रुपयांचा दंड आयोजकांवर  ठोठावला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगावात रॅली काढून संयुक्त महाराष्ट्र चौकात जाहीर सभा घेतली होती. या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. पोलिसांनी अनेक कारणे दाखवून सभेला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, पण सभेला आवश्यक परवानगी घेतल्याची कागदपत्रे दखवल्यावर पोलिसांना गप्प बसावे लागले. परंतु सभेत मास्क घातले नव्हते, सोशल डिस्टन्स पाळला गेला नसल्याचा ठपका सभेच्या आयोजकांवर ठेवून, प्रशासनाने एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

पार्श्वभूमी

पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार, 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया....  
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करुन आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Maharashtra Coronavirus : राज्यात 58924 नवीन रुग्णांचे निदान, तर 52412 रुग्ण बरे होऊन घरी
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. सोमवारी (19 एप्रिल) 58  हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 52 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के झाले आहे.


Oxygen Express : पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी  रवाना, गाडीसाठी स्पेशल ग्रीन कॉरिडॉर!
महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (19 एप्रिल) मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला. सात टँकरसह ही एक्स्प्रेस विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. अंदाजे 24 तासात ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचेल आणि त्यानंतर तिथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. या एक्सप्रेससाठी राज्य सरकारकडून रेल्वेला टँकर्स पुरवण्यात आलेले असून रेल्वे हे रिकामे टॅंकर घेऊन देशातील विविध शहरांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.