मुंबई : राज्यात कडक लाकडाऊनला सुरुवात झाली आहे. दुसरी लाट थोपवण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण ही सर्व तयारी दुसऱ्या लाटेसोबत तिसरी लाट थोपवण्यासाठी आहे. महाविकास आघाडी सरकार तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी करतंय पाहुयात या रिपोर्टमधून. 


आता कोरोनाची तिसरी लाट?
एकामागोमाग एक कोरोनाची लाट येतेय आणि राज्याची वाट लागतेय. टास्क फोर्सनं दिलेली माहितीनुसार येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येत आहे. त्यामुळे सरकारही या तिसऱ्या लाटेच्या तयारीत आहे. तुलनेने मृत्यूदर कमी असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या 40 दिवसांवर आला आहे. रस्त्यावरची सद्य परिस्थिती आणि लोकांमधला हलगर्जीपणा असाच राहिला तर तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तिसरी लाट ही पावसाळ्यात येण्याची शक्यता आहे. आधीच साथीचे रोग, त्यात कोरोनाची साथ त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या जास्त वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर सरकार देखील सावध झालंय आणि तयारीला लागलंय.


सततचा लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणारा नाहीय. त्यामुळे लॉकडाऊन हा महाराष्ट्र समोरचा पर्याय नसणार आहे. सराकार लसीकरण ते कोव्हिड सेंटर असं सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात राबवण्याचा विचार करतेय. 


नेमका सरकारचा प्लॅन काय आहे?



  • सद्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने राज्याला ऑक्सिजन मिळेल एवढी क्षमता वाढवत आहेत. जिकडे रुग्णालय आहेत, तिकडेच ऑक्सिजनचा प्लांट उभा केला जाईल. 

  • तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे, त्यासाठी प्रत्येक माणसाचं लसीकरणावर सरकार भर देतंय. 

  • रेमडिसीवर इंजेक्शनचा साठा व उत्पादन कसं मुबलक प्रमाणात करता येईल यावर भर आहे. जॅम्बो कोव्हिड सेंटरला रेमडिसीवर इंजेक्शनला जास्तीत जास्त पुरवठा केला जाईल. व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करायचे आहेत. 

  • शिवभोजन थाळीसारखे उपक्रम गरीब व दुर्बल घटकांसाठी मदत. 

  • उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित करणे.

  • अनेक उद्योगांनी त्यांच्या परिसरात विलगीकरण सुविधा उभारण्याची तयारी सुरु आहे.

  • राज्यात कडक लॉकडऊनला सुरुवात झाली आहे, दुसरी लाट थोपवली तर तिसरी लाट थोपवण्यास सोपं जाईल पण तिसरी लाट ही अधिक धोकादायक असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे पुढच्या काळात नागरिकांची जबाबदारी आणि लसीकरण कसं होतंय यावर तिसरी लाट अवलंबून आहे. वाढलेल्या सुविधा आणि नागरिकांनी नियमाचं पालन केलं तर तिसरी लाट थोपवण्याणं सहज शक्य होईल.