मुंबई : राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पहायला मिळत आहे. आज राज्यात तब्बल 25,833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेडचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आज 12,174 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,75,565 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.79% एवढे झाले आहे. राज्यात आज 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.22% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,79,56,830 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,96,340 (13.35 टक्के) नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,66,353 अॅक्टीव रुग्ण आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 4965 कोरोना रुग्णांची नोंद तर 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू. 9486 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही पुणे जिल्ह्यात एका दिवसात आढळलेली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. या आधी मागील वर्षी 10 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यात 4935 रुग्णांची नोंद झाली होती. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. कारण, रोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून तब्बल 35,539 अॅक्टीव कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यानंतर नागपूरमध्ये 24 हजार 209 अॅक्टीव रुग्ण आहेत. नागपूरमध्ये कडक निर्बंध असतानाही रुग्णसंख्या वाढतच आहे. नाशिकमध्येही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.