वर्धा : परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 टक्के गुण मिळण्याचा निकष आहे. पण यंदा कोविडमुळे शिक्षणात अडथळा आला आहे. शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाची परिस्थितीही सगळेच जाणतात. अशा स्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करावा, अशी सूचना विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र अडचण होत आहे. प्रत्येक ठिकाणी कनेक्टिीव्हीटी मिळेलच, याचीही शाश्वती नसते. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकरता उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्क्यांवर आणावा. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण उपलब्ध झाले नाही, अशा विद्यार्थ्यांचा योग्य विचार करावा. दहावी, बारावीची परीक्षा संपेपर्यंत शैक्षणिक सत्र सुरु ठेवावं. परीक्षा संपल्यानंतर पंधरा दिवसांनी गैरहजर विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी आदी शिफारसी विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केल्या आहेत. यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान राज्य परीक्षा नियोजन समिती दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करण्याच्या शिफारशीवर गांभीर्याने विचार करत असल्याचं कळतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 2020-21 या सत्राक फारच कमी कालावधीसाठी शाळांचे वर्ग भरले. आता 23 एप्रिल ते 21 मे बारावीच्या आणि 29 एप्रिल ते 20 दहावीच्या परीक्षा घेण्याचं ठरलं. या परीक्षेचं नियोजन आणि स्वरुप ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा नियोजन समितीची स्थापना केली आहे.