मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. त्यात आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55411 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.18 % एवढे झाले आहे.
राज्यात आज 309 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर १.७२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबई महानगरपलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद आज झाली आहे.
राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. उद्या टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली.
मुख्यमंत्री काय म्हणाले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठकीत सांगितलं की, सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल.