Maharashtra Corona Lockdown : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोनासंबंधी सादरीकरण देखील केलं. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन केलं.


राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधत आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली. 


बैठकीत अशोक चव्हाण यांनी मांडलेले मुद्दे


या बैठकीत मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी. महाराष्ट्राने चाचण्या वाढवल्याने रूग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कर्जफेडीसाठी गतवर्षीप्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी. केंद्राकडून कोरोना लसीचे वितरण रूग्ण संख्येच्या प्रमाणात होण्याबाबत विनंती करणे. कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील, असं चव्हाण म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा,  राजेश टोपेंचं आवाहन
बैठकीत आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही.  पुणे, मुंबई, नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले. 


आम्ही राजकारण बंद करतो पण... - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण ही लोकं जगली पाहिजे याचा विचार व्हावा, असं फडणवीस म्हणाले.