Sachin Sawant : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कौतुक केले आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, 'लोकशाहीसाठी मजबूत काँग्रेस महत्त्वाची आहे. गडकरी यांच्या या सल्ल्याचे सचिन सावंत यांनी कौतुक केले आहे. 


नितीन गडकरी यांनी म्हटले की, प्रादेशिक पक्षांना विरोधकांची जागा घेण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने मजबूत असणे गरजेचे आहे. केवळ निवडणुकीतील पराभवामुळे निराश होऊन कोणीही पक्ष किंवा विचारधारा सोडू नये. लोकशाही दोन चाकांवर चालते. या दोन चाकांमधील एक चाक सत्ताधारी पक्षाचे तर दुसरे चाक विरोधी पक्षाचे आहे. लोकशाहीला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर मजबूत झाला पाहिजे. काँग्रेस कमकुवत होत असताना इतर प्रादेशिक पक्ष त्याची जागा घेत आहेत. काँग्रेसची जागा इतर प्रादेशिक पक्षांनी घ्यावी हे लोकशाहीसाठी चांगले नाही."


गडकरी यांच्या या सल्ल्यानंतर सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या भावना चांगल्या आहेत. त्यांनी जी काळजी दाखवली आहे त्याचे आम्ही कौतुक करतो. परंतु, मोदी सरकार देशातील लोकशाही कशी चिरडून टाकू पाहत आहे, हे त्यांना माहीत नाही का? काँग्रेस पक्ष हा देशाचा प्रमुख विरोधी पक्ष असून काँग्रेसची विचारधारा आणि विचार देशहिताचे आहेत याची जाणीव लोकांना होईल." 


ज्या राज्यात भाजप सोडून इतर पक्षांचे सरकार आहे, अशा सरकारला त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. गेल्या आठ वर्षांपासून देशात ज्याप्रकारचे राजकारण केले जात आहे ते अभूतपूर्व आहे. विरोधी पक्ष नष्ट करण्याच्या आणि लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर करण्याच्या भाजपच्या मानसिकतेवर नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्यास ते लोकशाही आणि देशाच्या हिताचे ठरेल, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या