Tanaji Sawant ON NCP Congress : सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? असा सवाल करत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. सावंत म्हणाले की, आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना विस्थापितांचा गट आहे. कोणीही आजमावून बघू नये.  शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलं आहे, असंही सावंत म्हणाले. सोलापुरात तानाजी सावंत यांनी मागील अडीच वर्षात शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचे दाखले देत टीकेचे बाण सोडले. 


राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो


सावंत म्हणाले अर्थसंकल्पात 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 काँग्रेसला, 16 टक्के शिवसेनेला त्यातही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ 10 टक्के बजेट शिवसेनेला मिळालं आहे, असं सावंत म्हणाले. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. प्रचंड नाराजी आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे, असं ते म्हणाले. 


अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा
तानाजी सावंत म्हणाले की, ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता.  एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं?  आमच्या नादीला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल.  मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा.  


आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता?  केवळ स्टेजवर बोलण्याचे विरोधक आहेत का ते? आतून तुमची सेटिंग आहे का? त्यांचा ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपये आणतो आणि आम्हाला काय? शिवभोजन थाळी चालवा, महिन्याचे बिल यायची वाट बघा. भाजप सोबत सत्तेत असताना देखील आमच्यासोबत हेच होतं होतं, आता ही हेच होतं आहे, असंही तानाजी सावंतांनी म्हटलं आहे.