मुंबई : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या.
तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच साधनसामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.
दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गातील 38 गावांना अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्याने कोविड रुग्णालय किंवा ऑक्सिजन यंत्रणा सुसज्य रहावी यासाठी जनरेटर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरुन विद्युत पुरवठा खंडित न होता कोविड रुग्णांवर उपचार सुरु राहातील असं नियोजन केलं आहे. हे वादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर आल्यास वेंगुर्ले, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील 38 गावांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वादळाचा काळ तीन दिवसाचा आहे. त्यामुळे किनारपट्टीसह जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. एनडीआरएफची टीम जिल्ह्यात तैनात करण्यात आली नाही, मात्र आवश्यक असल्यास एनडीआरएफची टीम पुण्यात तयार असून मागवण्यात येईल.
रत्नागिरीत मच्छिमार बोटी किनाऱ्याकडे परतल्या
कोकण किनारपट्टीला तोक्ते चक्रीवादळ धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिक आणि गावांना सतर्क करण्यात आलेलं आहे. यावेळी मुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याची चक्रीवादळाची गती पाहता त्याची तीव्रता जास्त नसली तरी आगामी दोन ते चार दिवसातील चक्रीवादळाची परिस्थिती कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. यावेळी ताशी 50 किमी वेगानं वारे वाहणार असून किनारपट्टी भागात प्रशासन सर्व तयारी करताना दिसत आहे. खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमार बोटी देखील आता किनाऱ्याकडे परतू लागल्या आहेत.