मुंबई : कोरोनामुळे सध्या सगळीकडेच नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये एकदिवस आधी दाखल होणार आहे. 31 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 


तौकते वादळ भारतीय हद्दीतून 21-22 मे ला बाहेर पडल्यानंतर पोषक वातावरण तयार होत असल्याने त्यानंतर आठ दिवसात अरबी समुद्रात मान्सून दाखल होणार आहे. तर 21 मे रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्याआधी 20 मे पासून बे ऑफ बंगालमध्ये मान्सूनला पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.


मुंबई महापालिका सज्ज
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असून हे चक्रीवादळ दिनांक 15 व 16 मे रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. 


त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे व योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या अंतर्गत प्रामुख्याने धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिना-याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी त्याचप्रकारे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे.


‘तौकते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत


जंबो कोविड सेंटरसह इतर परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणीः कोविड बाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या जंबो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणा-या धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे. यानुसार भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, एन.एस.सी.आय. डोम, एम.एम.आर.डी.ए., बीकेसी जंबो, नेस्को जंबो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणा-या जंबो कोविड केंद्रांलगतच्या 384 झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर ठिकाणी असणा-या धोकादायक झाडांची छाटणी देखील करण्यात येत आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे.


समुद्रकिनाऱ्या जवळील वस्त्यांबाबत सतर्कता व सुसज्जताः समुद्र किनारी असणा-या ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, त्या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवा-याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.     


पाणी तुंबण्याच्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्थाः पालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.  


पूर बचाव पथके तैनातः वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलीसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क व सुसज्जः आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना व सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.


वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी तयारी करावी : वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात येत आहेत.