मुंबई : कोरोना संकट सुरु असतानाच आता आणखी एक नैसर्गिक संटक देशावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. 14 मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.






चक्रीवादळ टौकटे (Tauktae) लक्षद्वीपच्या दक्षिणेस तयार होईल आणि केरळच्या किनारपट्टीजवळ येण्याचा अंदाज आहे. यामुळे 14 आणि 15 मे दरम्यान केरळ आणि कर्नाटका राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसांत चक्रीवादळ टौकटे अधिक तीव्र होईल, असा जागतिक अंदाज वर्तवित आहेत. काही हवामान मॉडेल्सनुसार ओमान किंवा पाकिस्तानच्या दिशेने हे वादळ प्रवास करेल. युरोपियन एन्सेम्बल प्रिडिक्शन सिस्टम (ईपीएस) चा अंदाज आहे की हे चक्रीवादळ 17 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.






भारत हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक एम. महापात्र यांनी सांगितले की, “आतापर्यंत हे चक्रीवादळ अरबी समुद्रापासून वायव्य दिशेने प्रगती करीत आहे. चक्रवादळ मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे महापात्र म्हणाले की, चक्रीवादळ कोणत्या मार्गाने प्रवास करील याची माहिती लवकर मिळाली आहे. या वादळावर आयएमडी बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार निर्देश जारी करेल.


यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार
यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "यंदा मान्सून वेळ म्हणजेच 1 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा प्रारंभिक अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवेल."