राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच, सुनिल केदार यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar : बैलगाडी मालक व पशुपालक सुजाण असून त्यांनी पोकळ भुलथापांना बळी पडू नये,असे केदार म्हणाले.
Maharashtra Cabinet Minister Sunil Kedar : राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच राज्यात बैलगाड्या शर्यत सुरु होतील, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यत सुरू व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील असून याबाबत सुरुवातीपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2014 पासून बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालिन सरकारने त्यासंदर्भात 2017 मध्ये कायदा लागू केला. परंतु पाठपुराव्या अभावी 2017-2018 पासुन आजवर कोणतीही ठोस सकारात्मक घटना यादरम्यान झाली नाही आणि शर्यती बंदच राहिल्या, असे केदार म्हणाले. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात बैलगाडा चालक,शेतकरी,पशुपालक आणि लोकप्रतीनिधी यांची बैठक घेण्यात आली आणि या विषयास पुन्हा चालना मिळाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याबरोबर यावर्षी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. यासाठी दोन महिन्याखाली सर्व बैलगाडा मालक,पशुपालक यांची मंत्रालयाच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली, असं केदार यांनी सांगितलं.
बैलगाडी शर्यतीसंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया 4 वर्ष प्रलंबीत व बंद पडलेली होती. ती या शासनाने सुरू केली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास वाटतो. बैलगाडी मालक व पशुपालक सुजाण असून त्यांनी पोकळ भुलथापांना बळी पडू नये,असे केदार म्हणाले.
बैलगाडी शर्यत मुद्द्यावरुंन गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
''जेव्हा मी आणि सदाभाऊ खोत बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु, तेव्हा सरकारची पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याचे उद्योग करु नयेत.'' अशा आक्रमक शब्दात बैलगाडी शर्यतीच्या विषयावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. पशुसंवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती. आता डिसेंबर महिना उजाडला आहे, ही बैठक फक्त राजकारणासाठी घेतली होती का? असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करताना पडळकर म्हणाले, ''झरे गावामध्ये 20 ऑगस्टला आम्ही बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या, आम्ही शर्यती घेतल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि 24 ऑगस्टला मंत्रालयात अनेक मंत्री आणि अनेक बैलगाडी चालक-मालक संघटनच्या उपस्थितीत बैठक झाली. तेव्हा पशु संवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती. पण अजून यावर काहीही निर्णय होत नाही.''