Maharashtra Budget Session 2022 Pravin Darekar on Nawab Malik: राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की,  25 वर्षांनंतर शिवसेनेला साप दिसला. देशाच्या विरोधात ज्याने फणा काढला त्यालाच तुम्ही कॅबिनेटमध्ये बसवलं, तर तो मुख्यमंत्र्यांना दंश करेल. त्यापेक्षा त्यांना कॅबिनेट मधून हटवा, अशी टीका दरेकरांनी मलिकांचं नाव न घेता केली. 


जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू


प्रवीण दरेकर म्हणाले की, देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा. देशद्रोही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. सभापती यांच्याकडे बोलण्यासाठी परवानगी मागितली परंतु त्यांनी मला बोलू दिलं नाही. त्यांच्या जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू. जर ते जेलमध्ये असतील मग त्यांच्या खात्याच्या कामकाजाचं काय होईल, असं ते म्हणाले. 


राजीनामा मिळणार नसेल तर आम्ही सभागृह चालू देणार नाही


दरेकर यांनी म्हटले की, नवाब मलिकांच्या राजीनामा मिळणार नसेल तर आम्ही सभागृह चालू देणार नाही. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हटले की, ज्यांना ईडीने अटक केली, त्यांचा राजीनामा व्हायला हवा ही मागणी लावून धरणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत नवाब मलिकांचा  राजीनामा घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असेही त्यांनी म्हटले. 


दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे


मंत्री जेलमध्ये आहे आणि राजीनामा झाला नाही असं पहिल्यांदा घडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  हसिना पारकरला पैसे दिले आहेत, त्यातून नवाब मलिकांना अटक झाली आहे. हसिना पारकर ही दाऊदची बहीण आहे. दाऊदच्या बहिणीला पैसे देणे म्हणजे दाऊदला मदत करण्यासारखे आहे. दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Budget 2022: सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका


Maharashtra Budget Session 2022 : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी! भाषण 22 सेकंदात थांबवून राज्यपाल निघाले


Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले