Maharashtra Budget Session 2022 : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपतं घेतलं. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. अवघ्या दीड मिनिटात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या दीड मिनिटानंतर भाषण पटलावर ठेवत थांबवलं. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली. 


महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्य़ाचे पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. 


अधिवेशन वादळी ठरणार


राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली गेली आहे. काल (बुधवारी) दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha