Maharashtra Budget : हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, जे आश्वासन दिले ते वेळेत पूर्ण करू; देवेंद्र फडणवीसांचा शब्द
Maharashtra Budget : हा अर्थसंकल्प निवडणुकीचा नसून निर्धाराचा आहे, वेळेत सर्व आश्वासनं पूर्ण करणार असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
मुंबई : अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) हा सर्वसमावेशक असून शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सर्व घटकांच्या इच्छा पू्र्ण करणारा आहे अशी स्तुतीसुमने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उधळली. हा थापांचा अर्थसंकल्प नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. सरकारने दिलेली सर्व आश्वासनं ही निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प हा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणारा आणि युवांना रोजगार देणारा हा अर्थसंकल्प आहे.
विरोधकांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी खोटे नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या काही जागा जिंकल्या, त्यावर आजचा अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पडले. विरोधकांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांचे चेहरे उतरले होते. ते केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प इतिहास निर्माण करणारा असेल. यामध्ये आम्ही जे जे आश्वासन दिलेले आहे ते सर्व वेळेत पूर्ण करून दाखवू. हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नव्हे तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे.
सर्व गोष्टींचा विचार करून अर्थसंकल्प
अर्थसंकल्पावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. आम्ही नवखे नाही. उद्या निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीसाठी तेवढा फंड आपल्याकडे आहे का? सगळ्या गोष्टी त्यामध्ये बसत आहे का? हा सगळा विचार करत अर्थसंकल्प सादर केला. वीज माफी द्यायची आमची इच्छा होती, विजेची माफी दिली आहे. लाभार्थींच्या खात्यात पैसे जाणार आहेत. गायीच्या दुधाला 5 रुपये मदत दिली. युवकांसाठी मदत केली आहे. ॲप्रेंटशिप मध्ये 10 हजार रुपये मिळणार आहेत. कापूस, सोयाबीन संदर्भात देखील आम्ही सांगितलंय.
अजित पवार म्हणाले की, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आता 100 टक्के उच्च शिक्षण मिळणार आहे. केंद्राच्या वाढीत देशाचा विचार केला तर राज्याचा हिस्सा 15 टक्क्यांच्या जवळपास आहे. आपलं उद्दीष्ट 50 ते 60 हजार कोटींनी वाढत आहे. जीएसटी आणि महसूल संकलनात देखील वाढ होत आहे. अर्थसंकल्पात काही रक्कम कमी वाटत असली तरी पुरवणीत आम्ही ती रक्कम वाढवू. 16 व्या वित्त आयोगात भरीव मदत आपल्याला मिळणार आहे. ठाणे, मुंबई आणि बृहमुंबईतील पेट्रोल डिझेलचा दर कमी केला आहे.
ही बातमी वाचा: