Maharashtra Breaking News LIVE Updates : जेजुरी येथील टायर मोल्डिंग दुकानाला भीषण आग
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
राज्यात थंडीचा कहर; नागपुरात दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू
नागपूरमध्ये थंडीचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचाही मृत्यू थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूरच्या कपिल नगर परिसरात 53 वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के यांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला आहे. ते ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते आणि तिथेच ते मृतावस्थेत आढळले. तर जागनाथ बुधवारी परिसरात रस्त्यावरच 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा फुटपाथवर मृत्यू झाला आहे.
देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात पारा 8.5 अंशांवर घसरला आहे. तर कोल्हापुरातही पारा घसरला असून 14 अंशांवर घसरला आहे. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.
MHADA Exam: रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षा फेब्रुवारीमध्ये, ऑनलाईन पद्धतीनं होणार परीक्षा
म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक ठरलं असून 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत म्हाडाची सरळ सेवा भरती परीक्षा होणार आहे. म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळं म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
म्हाडाची 12 डिसेंबरला होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री ट्वीट करत ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. म्हाडाची परीक्षा सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
जेजुरी येथील टायर मोल्डींग दुकानाला भीषण आग
जेजुरी येथील टायर मोल्डींग दुकानाला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. जवळपास दोन तास उलटूनही आग आटोक्यात नाही. टायरच्या दुकानाशेजारी पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीत कारकर यांचे 50 लाखांचं नुकसान झाले आहे.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल. हरभरा, मुंग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदेबाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याने, सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.























