मुंबई : शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मुंबई महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेसोबत युती न करण्याच्या मुद्द्यावर भाजपने एकमत झाले असून स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांची रणनीती ठरवण्यासाठी फडणवीसांच्या निवासस्थानी आज भाजपने बैठक बोलवली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला. पण स्वबळावर महापालिका निवडणूक लढवू आणि एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करा अशा सूचना देखील देवेंद्र फडणीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या आहेत. एबीपी माझा सूत्रांनी ही माहिती दिली. भविष्यात शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश देखील फडणीस यांनी आजच्या बैठकीत दिले आहे. तसेच भाजप आरपीआय सारख्या छोट्या पक्षांना सोबत घेण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची संख्या 227 वरुन 236 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला शंभरहून जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. मुंबईतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद पाहता हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. अशावेळी भाजपकडून मुंबईत मनसेची मदत घेतली जाऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक प्रमुख नेते मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटले. मात्र, या भेटींमधून महानगरपालिका निवडणुकीसाठीची बोलणी पार पडली का, याविषयी निश्चित माहिती नाही. परंतु, आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिल्याने भाजप-मनसे युतीबाबातच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
हे देखील वाचा-
- Club House App : क्लब हाऊस अॅप प्रकरणातील आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी
- कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
- Mumbra News : पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही, घरांबाबतच्या मध्य रेल्वेच्या नोटिशीनंतर खासदार शिंदेंची आक्रमक भूमिका