Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya)  मंत्रालयातील व्हायरल झालेल्या फोटोनंतर आता मंत्रालयातील (Mantralay) कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या हे मंत्रालयातील नगरविकास विभागात एका केबिनमध्ये फाईल तपासात होते आणि त्यावेळी किरीट सोमय्या यांना बसायला खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि तसे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे. 


 किरीट सोमय्या म्हणाले, मंत्रालयात किरीट सोमय्या नेमक्या कोणाच्या फाईल बघत होते? उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर की अशोक चव्हाण? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणी हवी ती चौकशी करावी एसआयटी नेमावी आम्ही कोणाला घाबरत नाही.  घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. 


काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की,  भाजप नेत्यांची मानसिक स्थिती हलाखीची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी आहे. किरिट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सावंत यांनी म्हटले. सोमय्या यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. 


महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी  राज्य सरकारच्या मंत्र्यांविरुद्ध आणि आघाडींच्या नेत्यांविरोधात अनेक आरोप केले आहे. त्यावरून ते  कायमच चर्चेत राहिले आहे.