मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.


यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.


Maharashtra Assembly Budget Session | 1 ते 10 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही होणार नाही!


वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे.


विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात नाही
दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचं कळतं.



अधिवेशनात नेमके किती दिवस कामकाज होणार?
- पहिला दिवस (1 मार्च) - राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
- दुसरा, तिसरा दिवस (2 मार्च, 3 मार्च) - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
- चौथा, पाचवा दिवस - (4 मार्च, 5 मार्च) - पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
- सहावा, सातवा दिवस (6 मार्च, 7 मार्च) - शनिवार, रविवारची सुट्टी
- आठवा दिवस (8 मार्च) - अर्थसंकल्प सादर होणार
- नववा दिवस (9 मार्च) - शासकीय कामकाज
- दहावा दिवस (10 मार्च) - अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता