मुंबई : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.


वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पण सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात नाही
दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचं कळतं.


अधिवेशनात नेमके किती दिवस कामकाज होणार?
- पहिला दिवस (1 मार्च) - राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
- दुसरा, तिसरा दिवस (2 मार्च, 3 मार्च) - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
- चौथा, पाचवा दिवस - (4 मार्च, 5 मार्च) - पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
- सहावा, सातवा दिवस (6 मार्च, 7 मार्च) - शनिवार, रविवारची सुट्टी
- आठवा दिवस (8 मार्च) - अर्थसंकल्प सादर होणार
- नववा दिवस (9 मार्च) - शासकीय कामकाज
- दहावा दिवस (10 मार्च) - अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकी सत्ताधारी-विरोधकांची खडाजंगी
दरम्यान अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपचे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध शिवसेनेचे अनिल परब यांच्या जोरदार घमासान झालं. अधिवेशनात कोरोना दिसतो, संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाच्यावेळी कोरोना दिसला नाही का? असा प्रश्न विचारत दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही भाजप नेत्यांनी सरकारला दिला. अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्यावर भाजपचा भर होता.


कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून विरोधकांचा वॉकआऊट
दरम्यान या खडजंगीनंतर विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारला कुठलीही चर्चा करण्यास रस नाही. कोरोनाची भीती दाखवून अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या पळपुटेपणाचा निषेध करत आम्ही बैठकीतून वॉकआऊट केला."


संबंधित बातम्या


विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका


Maharashtra Assembly Budget Session | विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाने पर्याय सुचवला!


अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत