करमाळा : करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात नावेतून फिरण्याचा मोह घातक ठरला असून सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील वांगी 3 परिसरातील उजनी जलाशयात ही दुर्घटना घडली. जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे प्राण वाचवले.
काल दुपारी तीन अकलूज येथील हे शेंडगे कुटुंब नावेतून उजनी जलाशयात फेरफटका मारत होते. यावेळी नाव खोल पाण्यात आली असताना उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह त्यांचा जीव घेऊन गेला. फोटो काढताना नाव उलटली आणि यात विकास शेंडगे (39) आणि त्यांचा 13 वर्षाचा मुलगा जय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र याचवेळी इतर मच्छीमारांनी या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकत विकास यांची पत्नी स्वाती, नऊ वर्षाची मुलगी अंजली, विकासचे मित्र जयवंत सातव व सातव यांच्या मुलाला वाचवले.
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं उजनी जलाशयात नाव उलटून अकलूज येथील काही डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. सध्या उजनी जलाशयात खूप पाणी असून पाण्याची पातळी देखील खूप खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. अशावेळी खोल पाण्यात सेल्फीचा मोह शेंडगे कुटुंबाला घातक ठरला आणि बाप लेकाला आपला जीव गमवावा लागला. वाचवण्यात आलेल्या शेंडगे यांच्या पत्नी व मुलीला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.