मुंबई:  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)  यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच माझा विनायक मेटे करण्याचा डाव असल्याचं वक्तव्य त्यांनी नांदेडमधील कारेगावात आयोजित सत्कार समारंभात केलंय. मंत्रीपदाच्या काळातील लेटर हेडचा गैरवापर करून अज्ञाताने बनावट पत्रे तयार केली असल्याची तक्रार अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे.  एवढंच नव्हे तर घातपात घडवण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केल्यानं राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे.


अशोक  चव्हाण म्हणाले, माझ्या लेटरपॅडचा दुरूयोग होतो आहे, याची माहिती मला मिळाली. लेटरपॅडचा वापर करून अनेकवेळा वेगेगळ्या विषयांबाबत आपण पत्र देत असतो. अशावेळी बनावट पत्राच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यावर फक्त माझी सही आहे बाकी काहीचं नाही. कुणीतरी गैरवापर करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी मागणी होती. परंतु कुणीतरी चुकीचा वापर करत आहे. 


राजकीय द्वेष आणि इर्षेतून हा प्रकार घडत आहे


मला जपून राहिलं पाहिजे कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला मग तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबत तर नाही ना? अशी शंका मनात येऊ लागली आहे. माझा विनायक मेटे करण्याचा डाव आहे. मी नांदेड पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तपासाअंती वास्तव समोर येईल. राजकीय द्वेष आणि इर्षेतून हा प्रकार घडत आहे. हा प्रश्न फक्त मराठा समाजापुरता नाही. भाविनक, सामाजिक भावना भडकवण्याचा काहींचा उद्देश असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांचा विषय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्यावर सोडला


 अशोक चव्हाण म्हणाले, लोकप्रतिनिधींनीबाबत असं होणे योग्य नाही. तपास गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण आम्ही कधीही असे प्रकार केले नाहीत परंतु ज्यांना हे योग्य वाटतंय त्यांना हे रोखायला हवं. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा विषय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्यावर सोडला आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात होतो. अनेकवेळा आम्ही प्रयत्न केले मात्र आम्हाला यश आलं नाही. आम्हाला अपेक्षा आहे उद्धव ठाकरेंना यामध्ये यश येईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Ashok Chavan : माझा 'विनायक मेटे' करण्याचा डाव; अशोक चव्हाण यांचा खळबळजनक आरोप