नांदेड : "माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील कारेगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी हा गंभीर आरोप केलाय.
आपला घातपात घडवण्याची भीती अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या संदर्भात आज दुपारी अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली आहे.
अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, " आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाच्या कार्यकाळात काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील स्वाक्षरी कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. याची कुणकुण अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेड देखील मिळाले होते.
यानंतर अशोक चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या तक्रारीनंतर 31 जानेवारीपासून या प्रकरणी पोलीस चौकशीदेखील सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
माझ्यावर पाळत ठेवली जात आहे...
"आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असून, तो व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करत आहे. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असल्याचा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला आहे. तसेच बनावट पत्रे तयार करून विविध समाजात बदनामी करून, सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या