Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील मनपा कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या प्रकरणी मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपातील वाटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या वतीने आमरण उपोषण (Protest) सुरू करण्यात आले होते. मात्र सरकारवाडा पोलिसांकडून संबधित उपोषण कर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेतील (Nashik NMC) शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या 'वॉटरग्रेस' कंपनीने बेकायदेशीररीत्या कामावरून काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या सफाई कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सफाई कामगार आणि कुटुंबीयांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. मात्र या उपोषण प्रकरणी मनसेच्या पदाधिकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या समोरील राजीव गांधी भवनसमोर हे उपोषण सुरू आहे. अशातच नाशिक शहर पोलिसांकडून शहरात मनाई आदेश सुरू असल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची लेखी पूर्वपरवानगी न घेता एकत्र येऊन मोठ्याने घोषणा देऊन आमरण उपोषणास बसल्याप्रकरणी सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir), मनसे चिटणीस तुषार जगताप, प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, ज्ञानेश्वर बागडे यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहर स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने शहरातील कचरा गोळा करणे तसेच स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युनियन स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असता, ठेकेदाराने युनियनला विरोध केला आहे. दरम्यान, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने ठेकेदाराने आंदोलनात सहभागी कर्मचान्यांना कामावरून कमी केले व नवीन भरती केली होती. ठेकेदाराने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांना मनसेच्या सहारा
नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वॉटरग्रेस कंपनी स्वच्छतेचे काम करत आहे. शेकडो कर्मचारी नाशिक शहराची स्वच्छता वॉटरग्रेस कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, वॉटरग्रेस कंपनी आणि कर्मचारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला होता. त्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. नाशिक महानगरपालिकेतील सुमारे 450 कंत्राटी सफाई कामगारांना वॉटर ग्रेस या कंपनीने एका दिवसात बेकायदेशीरपणे काढून टाकले गेल्या चार महिन्यांपासून हा लढा सुरू आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात आले होते.