मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र  पडसाद राज्यभर उमटत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाना पटोले यांना अटक करा अशी मागणी केली आहे. 


  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. नारायण राणे म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत. त्याचा मी निषेध करतो. कॉंग्रेसच्या नेत्यांनी अशा प्रकराची वक्तव्य केले याबद्दल मला नवल वाटले नाही. आता  नाना पटोले यांना उटक करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला आहे.


 




राज्यातील विविध ठिकाणी भाजपने पटोलेंविरोधात आंदोलनं केली आहेत.  नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली. फडणवीस म्हणाले,  काँग्रेस पक्षाचं चाललं तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.' 


काय म्हणाले नाना पटोले?


भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.  प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले. त्यानंतर हा व्हिडीओ  व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं. नाना पटोले म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही."


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha