अकोला : 'त्या' दिवशी वडील 'ति'च्यावर चांगलेच रागावलेत. "तु अभ्यास करीत नाहीस. परीक्षेत मार्क कसे चांगले मिळतील. पुढे तुला मोठं व्हायचंय. तु अभ्यास केला नाही तर मी तुझ्या शिक्षणासाठी घेत असलेले कष्ट काहीच कामाचे नाहीत"... वडीलांचा हेतू जरी समजावणीचा असला तरी आवाज मोठा होता. वडील रागानं बोलत असतांना ती खाली मान घालून मुकाट्यानं ऐकत होती. मात्रं, हे ऐकत असतांना एक वेगळ्याच विचारचक्रांत ती गुंग होऊन गेली होती. वडिलांच्या या कटकटीपासून कायमचं सुटण्याच्या हेतूनं एक वेगळाच 'प्लॅन', आयडिया तिच्या मनात शिजत होती. वडिलांनी तिला परत आवाज वाढवून विचारलं, "आता करशील की नाही अभ्यास"... तीनं घाबरंतच कसंबसं 'हो बाबा' म्हटलं. अन ती शाळेत जायच्या तयारीत लागली. 


 'त्या' दिवशी 'ती' शाळेत एका वेगळ्याच निश्चयानं गेली. हा निर्णय होता अभ्यासासाठी वडिलांची कटकट नको म्हणून घरून पळून जाण्याचा... ही गंभीर घटना घडली आहे अकोल्यात. या मुलीसोबत तिच्याच वर्गातील तिची मैत्रीणही तिला सोबत असावी म्हणून तिच्यासोबत पळून गेली होती. ही घटना पालकांना हादरवून सोडणारी तर आहेच. याबरोबरच पालकांना ती मुलांच्या बदलत्या कलांमुळे चिंतेतही टाकणारी आहे. अकोला पोलीस आणि परभणीच्या रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमूळे दोन 14 वर्षांच्या मुली उद्धवस्थ होण्यापासून वाचल्या आहेत. या दोन्ही मुलींना अकोल्यात त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. 


नेमकं काय झालं 'त्या' दिवशी? : 


अकोल्यातील खदान परिसरातील कैलासटेकडी भागात राहणारी 14 वर्षीय 'सृष्टी' (काल्पनिक नाव) ही अकोल्यातील एका शाळेत नवव्या वर्गात शिकत आहे. अल्लड स्वभावाच्या 'सृष्टी'चं मन अभ्यासापेक्षा खेळण्या-बागडण्याकडेच अधिक. 'सृष्टी'चे वडील नितीन (काल्पनिक नाव) हे स्वभावानं काहीसे तापट. परंतु, ते आपल्या लेकीबद्दल तेव्हढेच संवेदनशीही होते. 'त्या' दिवशी नितीन सृष्टीवर अभ्यासासाठी चांगलेच रागावलेत. वडील बोलत असतांना सृष्टी भीतीनं अक्षरश: कापत होती. वडील रागानं बोलत असतांना ती खाली मान घालून मुकाट्यानं ऐकत होती. मात्रं, हे ऐकत असतांना तिच्या डोक्यात एक वेगळ्याच विचारांचं काहूर माजलं होतं. तिला वडिलांचं हे अभ्यासासाठी दररोजचं रागावणं आता नकोसं वाटायला लागलं होतं. अन तिच्या नकळतं वय अभ्यासाच्या कटकटीतून कायमचं सुटण्यासाठी वेगळाच विचार करायला लागलं होतं. तिला माहित नव्हतं की आपण उचलत असलेलं पाऊल किती धोकादायक आहे. 'त्या' दिवशी 'ती' शाळेत फार वेगळा विचार करून आली होती. तिला फक्त या 'प्लॅन'बद्दल वर्गातील तिची जीवलग मैत्रीण 'वृंदा'ला (काल्पनिक नाव) सांगायचं होतं. 'ती' शाळेत पोहोचली अन तिथून या 'स्टोरी'त खरा 'ट्वीस्ट' आला. 


... अन् वर्गातच शिजला पळून जाण्याचा 'प्लॅन' : 


'त्या' दिवशी वर्गात असलेली 'सृष्टी'च्या चेहऱ्यावरील उदासी तिची जिवलग मैत्रीण 'वृंदा'च्या लक्षात आली. तिनं तिला विचारलं की, "तू उदास का आहेस?. 'सृष्टी'नं तिला वडिलांच्या रागावण्याचं कारण सांगितलं. अन त्याचवेळी तिनं वृंदाला म्हटलं की, आता घरी जाणार नाही. मी आता घर सोडून निघून जाणार आहे." हे सांगतांना 'सृष्टी'चे डोळे पाण्यानं डबडबले होते. यावेळी 'वृंदा'नं तिचा हात घट्ट पकडत तिला म्हटले की, "अगं वेडे!, तू एकटी कशाला जातेस. तुझ्यासोबत तुझी काळजी घ्यायला मी पण येते की".. आता सोबत पळून जाण्याचा 'प्लॅन' त्यांनी 'फायनल' केला. अन त्या दोघी आता शाळा सुटण्याची वाट न पाहता शाळेतच दप्तर आणि इतर साहित्य सोडून गायब झाल्यात.  यानंतर 'त्या' दोघींनी थेट अकोल्याचं रेल्वे स्टेशन गाठलं. अन् त्यांनी थेट परभणीकडे जाणारी रेल्वेगाडी पकडली. ही तारीख होती 9 मार्च. इकडे दोन्ही मुली वर्गातून एकाएकी गायब झाल्याने शिक्षकांनी त्यांच्या कुटूंबियांना याची सूचना दिली. त्यांनी खदान पोलिसांत मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 


पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुली आल्यात परत : 
 
या मुलींनी यानंतर थेट रेल्वेनं परभणी गाठलं. त्या दोघीही रेल्वे फलाटावर फिरत असतांना रेल्वे पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांनी दोघींनाही ताब्यात घेत त्यांची विचारपुस केल्यावर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर रेल्वे पोलिसांनी अकोल्याच्या खदान पोलिसांशी संपर्क केला. खदान पोलिसांनी या दोन्ही मुलींना परभणीतून ताब्यात घेतलं. अकोल्यात या दोन्ही मुलींना पालकांच्या सुखरूपपणे ताब्यात देण्यात आलं. रेल्वे पोलिसांच्या जागरूकतेमुळे या मुली चुकीच्या प्रवृत्तींच्या हातात जाण्यापासून बचावल्यात. पोलिसांनी दोन्ही मुलींच्या पालकांचं समुपदेशन करीत त्यांनी मुलांशी संवाद वाढविण्याचा सल्ला दिला. 


पालकांनो!, मुलांशी संवाद वाढवा : 


अलिकडे बदललेली जीवनशैली, मोबाईल आणि  सोशल मीडियामुळे घरातील संवाद हरवत चाललाय. मुलांशी पालकांचा संवाद व्यवस्थित होत नसल्याने ती एकलकोंडी होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अकोल्यातील ही घटना अलिकडच्या याच विसंवादावर प्रकाश टाकणारी आहे. मुलांकडून अपेक्षा करतांना त्यांच्याशी आपला संवाद तर तुटत चालला नाही ना?, याचं आत्मचिंतन या घटनेमुळे समाजाला करावं लागणार आहे.


संबंधित बातम्या :