Akola : आपल्या दैनंदिन जीवनात दुधाचा (Milk) वापर हमखास होतो. उत्तम आरोग्य आणि शरीरासाठी दूध पिणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? तुम्ही पित असलेल्या दुधामध्ये चक्क भेसळ केली जात आहे. म्हशीच्या दुधात भेसळ करत असल्याचा एक व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. अकोल्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दूध उत्पादकाची आयडिया, नागरिकांच्या जीवाशी खेळ
गाय-म्हशीचं दूध आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. म्हशीच्या दूधाचं उत्पादन कमी झाल्याने दुधाचा तुटवडा झाल्याने घरोघरी दूध पोहचवणाऱ्या एका दूध उत्पादकाने चक्क म्हशीच्या दुधाच्या कॅनमध्ये पाकीटच्या दूधाची भेसळ करतांनाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडिओतून दूध भेसळीचा संपूर्ण प्रकार दिसून येत आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातल्या मोठी उमरी भागात घडलाय. हा दूध भेसळीचा प्रकार उमरी भागातील एका हॉटेलवर सुरू होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईकरांनो दूध पिताना सावधान
मुंबईमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता, दुधात भेसळ होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं होतं. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता. पोयसर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करुन 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. जवळपास 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्यही यूनीट 12 व अन्न व सुरक्षा विभागाने जप्त केले होते.
आजवरची सर्वात मोठी कारवाई
नाशिकच्या सिन्नरमध्ये तर धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आजवरची सर्वात मोठी कारवाई होती. सिन्नर तालुक्यातील ओम सद्गुरु या दूध संकलन करणाऱ्या केंद्रावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली होती, जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्तिक कारवाई करत लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केलं होतं, मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडा यापासून हे भेसळयुक्त दूध बनवलं जात होतं. या कारवाईत रासायनिक मिल्क लिस्ट पावडर आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कास्टिंग सोड्याचा मोठा साठाही मिळून आला होता, नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात येत असल्याचा संशयावरून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने ही धडक कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दूध संकलन केंद्र चालकासह या केंद्राला रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विरोधातही सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा>>>