(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : अजित पवारांना डावललं?
Ajit Pawar: अजित पवारांशी एबीपी माझाने बोलण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
Ajit Pawar: अखेर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवलीच. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करत असल्याची घोषणा केली. अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांच्या या घोषणेवेळी अजित पवार दिल्लीत उपस्थित होते. घोषणेनंतर अजित पवारांशी एबीपी माझाने बोलण्याचा प्रयत्न केला. पण वर्धपानदिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या ढोल ताशांच्या आवाजामुळे काही ऐकू येत नाही, असे खुणवत अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
अजित पवारांनी केले नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील असे ट्विट करत अजित पवारांनी अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धपान कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा केली आहे. खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा