Maharashtar Rain : उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप, मात्र, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा अंदाज
उद्यापासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
Maharashtar Rain : राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, उद्यापासून राज्यात पावसाची स्थिती काय असू शकते याबाबतचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितला आहे. उद्यापासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
नेमकं काय म्हणालेत माणिकराव खुळे
संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त पुढील आठवडाभर म्हणजे सोमवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाची उघडीप मिळू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश ते सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात आजपासून (23 ऑगस्ट) तुरळक ठिकाणी किरकोळ पावसा व्यतिरिक्त उघडीपच जाणवेल अशी माहिती ही खुळे यांनी दिली आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अजुनही कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले. नद्या आणि कॅनॉल पात्रातील सध्या होत असलेला सततचा पाणी विसर्ग कायम व नियंत्रणात ठेवण्याचे कार्य सिंचन विभागाला चालूच ठेवावे लागेल, अशी स्थिती दिसत आहे. दरम्यान, कोकणातील 4 जिल्ह्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. तिथेही गुरुवारपासून (25 ऑगस्ट) पावसाचा प्रभाव किंचित काहीसाच कमी जाणवू शकतो. म्हणजेच त्यानंतरही तिथे मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे खुळे यांनी सांगितले.
विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
विदर्भात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून (26 ऑगस्ट) पुन्हा तिथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली.
बंगालच्या उपसागरात चक्री वादळ निर्मितीच्या तिसऱ्या अवस्थेतील समुद्रावरील हवेचा दाब म्हणजे तयार झालेले डिप डिप्रेशन, ओरिसा-बंगाल पूर्व किनारपट्टी ओलांडून देशाच्या भू- भागावर येताच आग्नेयकडून वायव्येकडे मार्गस्थ झाले. त्यामुळं ओरिसा पश्चिम बंगाल, झारखंड मध्य प्रदेश, सध्या राजस्थान या राज्यांना जोरदार पावसाने झोडपत तिथे पुरस्थिती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: