मोठी बातमी! महादेव जानकरांची 'मविआ'सोबत लोकसभेची डील, शरद पवारांकडून मोठी ऑफर
Mahadev Jankar : महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही असं मोठं वक्तव्य सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केले आहे.
Mahadev Jankar On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुतीमधील तीनही महत्वाच्या पक्षातील जागावाटपाचा (Seat Sharing) गणित बसत नसल्याचे चित्र असतानाच, आता दुसरीकडे मित्र पक्ष देखील थेट भूमिका घेतांना पाहायला मिळत आहे. 'महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही' असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आता थेट महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) बोलणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी (Sharad Pawar) लोकसभा निवडणुकीत जानकर यांना एक जागा देण्याचे आश्वासन देखील दिल्याची माहिती जानकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना जानकर म्हणाले की, "महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत, मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केलेली आहे. शरद पवारांनी एक जागा देण्याचं मान्य केलं आहे. आमचं बोलणं सुरु आहे, जोपर्यंत आमचं गणित बसत नाही. तोपर्यंत वाट पाहू, नाही तर स्वतंत्र लढण्याचा विचार आमचा आहे. तसेच, पंकजाताई आणि मी समर्थ आहोत. कुणी आम्हाला कितीही डावलल तरीही काहीही फरक पडत नाही. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही असं मोठं वक्तव्य सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केले आहे.
परभणीवर विशेष प्रेम...
माढा माझा होम पीच आहे. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल देणारं माझं नशीब आहे. परभणीत माझा आमदार निवडून आला आहे. परभणीला मी आजच ओळखत नाही, तर मागील 30 वर्षांपासून माझी सतत परभणीला भेट असते. याच परभणीने मला पहिला जिल्हा परिषद सदस्य दिला होता. त्यामुळे परभणीवर माझा डोळा आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचा जसा विकास झाला त्याप्रमाणे परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा देखील विकास करायचा असेल, तर मला परभणीकरांनी एक संधी द्यावी, असे जानकर म्हणाले.
शरद पवारांनी एक जागा देण्याचं म्हटले आहे
दरम्यान, पुढे बोलतांना महादेव जानकर म्हणाले की, महाविकास आघाडीत आम्हाला तीन जागा देण्यात यावेत अशी मागणी मी शरद पवारांकडे केली आहे. ज्यात परभणी, माढा आणि सांगली या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, शरद पवारांनी एक जागा देण्याचं म्हटले आहे. शरद पवारांचे यामुळे अभिनंदन करतो. मात्र, महाविकास आघाडीने आम्हाला विचारले नाही असेही जानकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :