Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha) भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मोहिते पाटील गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने पुन्हा एकदा निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवल्याने माढा लोकसभेला आता नेमकी लढत कशी होणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.


माढा मतदारसंघाचा अहवाल सादर  


एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी जाहीर निमंत्रण दिल्यानंतर ते या मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? अशी सुद्धा चर्चा आहे आणि दुसरीकडे मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडून सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभेचा आढावा घेऊन तो अहवाल शरद पवार यांच्याकडे सादर केला आहे. अहवाल सादर केल्यानंतर अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभेतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, जागा आमच्या पक्षाला सुटल्यास मी या जागेवरून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. दरम्यान अभयसिंह जगताप यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, पाठिंबा देण्याबाबत काही बोलले नाहीत, मात्र ते नाराज आहेत आणि मतदारसंघामध्येही नाराजी असल्याचे जगताप म्हणाले. 


दरम्यान रासपच्या महादेव जानकर यांना शरद पवार यांनी दिलेल्या निमंत्रणावर जगताप यांनी भाष्य केले. ते म्हणाले की जोपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीत सहभागी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होत राहणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य लक्षात घेता जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये आणून त्यांना माढा मतदारसंघ देण्याबाबत शरद पवार यांची खेळी आहे. मात्र, जानकर यांच्याकडून अजून कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात आलेली नाही. दुसरीकडे जानकर यांचे पुतणे जानकरांविरोधात उभे राहिले असून त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. 


धैर्यशील पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?


दुसरीकडे, निंबाळकर पाटील यांना भाजप उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मोहिते पाटील गटामध्ये शांतता पसरली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये शरद पवार गटाकडून धैर्यशील पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे सुद्धा चर्चा आहे. सोशल मीडियामध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. माढा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि निंबाळकर गटामध्ये त्रिवार संघर्ष सुरू आहे. मागील निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील गटाचे बळ मिळाल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही गटांमधील वाद टोकाला गेल्याने यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माहिती पाटलांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी असा दबाव समर्थकांकडून आणला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या