सांगली/मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) बिगुल आज (16 मार्च) वाजणार असतानाच राज्यामध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. काही जागांवर अजूनही काँग्रेस (Cognress) आणि ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) दावा असल्याने जागावाटपाचा तिढा पूर्ण झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पोहोचले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
काँग्रेस नेते शरद पवारांच्या निवासस्थानी
काल (16 मार्च) सुद्धा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काथ्याकूट करण्यात आला होता. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने आज पुन्हा एकदा शरद पवारांशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गट राज्यांमध्ये 23 जागा लढवण्यावर अजूनही ठाम असून यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाची मागणी आणि वंचितच्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. वंचितला महाविकास आघाडीने चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये कोणता तोडगा काढला जातो याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दुसरीकडे, काही जागांवर अजूनही दोन्ही पक्षांचा दावा कायम आहे. यामध्ये सांगली आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सांगली लोकसभेसाठी शिवसेनेने दावा केला असला तरी, काँग्रेस नाराज झाला आहे.
सांगली जागेच्या बदल्यात पुणे आणि चंद्रपूर जागांची मागणी
सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कुठल्याही प्रकारचे स्थान नसताना थेट उमेदवारीचे संकेत ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटील यांना देण्यात आल्याने सांगलीमध्ये मीठाचा खडा पडला आहे. सांगलीमधील काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले असून त्यांनी सांगली लोकसभेला दावा कायम केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून सांगली जागेच्या बदल्यात पुणे आणि चंद्रपूर जागांची मागणी करण्यात आल्याची समजते. त्यामुळे आता हा तिढा कसा सोडवला जाणार? याकडे लक्ष असेल.
यावेळी महाविकास आघाडी रिंगणात असल्याने काँग्रेसकडून विशाल पाटील यांचे सांगली लोकसभेसाठी पारडं स्थानिक पातळीवर जास्त मानलं जात आहे. दुसरीकडे भाजपकडून या ठिकाणी तिसऱ्यांदा संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास संजय पाटील यांचा मार्ग सोपा होईल, अशी सुद्धा सांगलीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेसाठी ताकद लावली जात असून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
दरम्यान सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा रंगल्यानंतर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी यशवंत होपे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना व्हाट्सअपवर मेसेज करून सांगली लोकसभेची जागा विशाल पाटील यांच्यासाठी मागितली आहे. विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल असेही म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा सुटणार का? याकडे आता लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या