रामटेक (जि. नागपूर) : महायुतीच्या रामटेक मतदारसंघाचा पेच कायम असतानाच शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे रामटेकमध्ये कामाला लागा अशा सूचना त्यांना मिळाल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून काल (16 मार्च) काटोल-नरखेड परिसरात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना कृपाल तुमाने यांनी लवकरच निवडणूक जाहीर होईल, पहिल्या फेरीमध्येच रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी सूचना केली. विशेष म्हणजे रामटेक मतदारसंघावर भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा दावा आहे. महायुतीत रामटेक संदर्भात अद्यापही अंतिम निर्णय झालेली नाही, तरी शिवसेनेने प्रचार सुरू केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


एवढेच नाही तर रामटेक मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यावरही रामटेकमध्ये उमेदवार बदलाचीही चर्चा सुरु असताना खा. तुमाने यांनी प्रचार सुरू केल्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे कडून हिरवा कंदील मिळाला आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. 


विदर्भातही सहा जागांवरून पेच


दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपावरून तिढा कायम असताना भाजपने आपल्या केंद्रीय दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने विदर्भात 10 पैकी 4 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. चंद्रपूरमधून वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांना उमेदवारी दिली आहे. वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी  दिली आहे, तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 10 पैकी 6 जागांवर अजूनही उमेदवारीवरून महायुतीत घोळ सुरु आहे.  


अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप इच्छूक असला तरी त्यांचा जातीचा दाखला वादात अडकला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात फ्लेक्सबाजी सुरु झाली आहे. दुसरीकडे, विदर्भात बुलडाणामधून प्रतापराव जाधव (शिंदे गट), रामटेकमधून कृपाल तुमाणे (शिंदे गट) आणि यवतमाळ वाशिममधून भावना गवळी  (शिंदे गट) खासदार आहेत. भंडारा आणि गडचिरोलीत भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. या दोन जागांवर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या