सातारा : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 20 जणांचा समावेश आहे. मात्र, साताऱ्यातून (Satara Loksabha) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी जाहीर न करण्यात आल्याने समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. जर योग्य निर्णय झाला नाही तर एकमताने निर्णय घेऊ अशी भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांनी मांडली आहे.


उदयनराजे पहिल्या यादीमध्ये नाव न आल्याने नाराज आहेत का?


या सर्व पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज (16 मार्च) सूचक प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा संभ्रमावस्था वाढवली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या मनामध्ये आहे तरी काय? अशी चर्चा रंगली आहे. आज उदयनराजे भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना माझ्याकडे तिकीट आहे, प्लेन तिकीट आहे, ट्रेनचं तिकीट आहे, पिक्चरचं तिकीट आहे, बसचं तिकीट आहे, मात्र इतर तिकिटाचं मला काही माहीत नाही असं सुचक विधान केलं. त्यामुळे उदयनराजे हे पहिल्या यादीमध्ये नाव न आल्याने नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. 


दरम्यान पुढील निर्णयावर आत्ताच बोलणे उचित नसल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले. त्यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले की, महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येकाला वाटते की मला तिकीट मिळाले पाहिजे. आणि ते रास्त असून त्यामध्ये चुकीचं काही नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर मी काही संन्यास घेणार नसल्याचे त्यांनी एक सूचक वक्तव्य यावेळी केले. त्यामुळे सातारा लोकसभेला उदयनराजे वेगळी भूमिका घेणार का? अशी चर्चा रंगली आहे. 


अजित पवार गटाकडून रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा


दुसरीकडे, सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) अजित पवार गट आग्रही आहे. त्यांनी सुद्धा सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून या जागेवर दावा केला आहे. अजित पवार गटाकडून रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंचा पत्ता कट होणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये नाराज आहेत का? अशीही चर्चा रंगली आहे. 


कार्यकर्ते आक्रमक 


दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सातारा दौऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर कोणतेही स्पष्ट संकेत न दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना सुद्धा घेराव घालत जाब विचारला होता. त्यामुळे राजे यांना उमेदवारी मिळत नसल्याने हा छत्रपतीच्या गादीचा अपमान असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी साताऱ्यामध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक घेत सर्वांचे मते जाणून घेतली होती. मात्र उदयनराजेंच्या उमेदवारीवर कोणते स्पष्ट संकेत दिले नव्हते. 


इतर महत्वाच्या बातम्या