(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार, चंद्राबाबू-नितीश कुमारांशी बोलणी सुरु, उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा निवडू: उद्धव ठाकरे
Uddhav Thacekray : लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीकडून केंद्रात सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात येईल. त्यासाठी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईतील शिवसेना भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मी त्यासाठी नागरिकांचे अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने रोखू शकतो, हे जनतेने दाखवून दिले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
पंतप्रधानपदाचा चेहरा निवडणार - उद्धव ठाकरे
सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने दावा करायला पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या संध्याकाळी दिल्लीत जाईन. संजय राऊत आणि अनिल देसाई सकाळी दिल्लीत दाखल होतील. या बैठकीत आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवू. आम्ही इंडिया आघाडी तयार केली. तेव्हा आमच्यापैकी कोणाच्याही मनात पंतप्रधानपदाची इच्छा नव्हती. देशाला हुकूमशाहीपासून वाचवणे, हा आमचा प्राथमिक उद्देश होता. उद्याच्या बैठकीत आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा सर्वानुमते ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एनडीएकडे बहुमत आहे, असे दाखवले जात आहे. बिहारमध्ये उशीरा मतमोजणी सुरु झाली, त्यामुळे तेथील निकाल यायचे आहेत. पण छोटे पक्ष, अपक्ष ज्यांच्यावर जुलूम, जबरदस्ती केली आहे, ते हे सरकार पुन्हा येऊ देणार नाहीत, याची खात्री आहे. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याशी काँग्रेस पक्षाकडून बोलणी सुरु आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांना भाजपने कमी त्रास दिलेला नाही. त्यामुळे हे सरकार उंबरठ्यावर आहे, त्यामुळे जुलूम जबरदस्तीला कंटाळलेले लोक आमच्यासोबत येतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंची मशाल पेटली आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दुभंगलेली शिवसेना ही पुन्हा खऱ्या अर्थाने उभी राहिली असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता देशात सत्तांतर होणार का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.