Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप (Mahavikas Aghadi Seat Sharing) जवळपास ठरले आहे. मराठवाड्यातील लोकसभा जागा वाटपाचे गणित जुळल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) महाविकास आघाडीने (MVA) आपल्या जागावाटपावर तोडगा काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातील 10 लोकसभा जागा वाटप निश्चित झाले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट दोन, काँग्रेस तीन आणि चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार आहे. एक मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने त्यांना कोणत्या जागा सुटणार, याकडेही लक्ष लागले आहे.
>> कोणती जागा कोणत्या पक्षाकडे?
> पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.
- पुणे शहर लोकसभा मतदारसंघ - या मतदारसंघातून कॉंग्रेस निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी यंदा कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे.
- बारामती- या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार हे नक्की आहे.
- शिरूर- या लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवणार हे नक्की आहे.
- मावळ - या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ते ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात.
>> सातारा -
- सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील उमेदवार असू शकतात. अथवा हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी शरद पवार सोडण्यास तयार झाल्यास पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असू शकतात, अशी देखील शक्यता आहे.
>> कोल्हापूर
- कोल्हापूर शहर मतदारसंघातुन शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पवार हे उमेदवार असू शकतात.
- हातकणंगले- या लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राजू शेट्टींसाठी सोडला जाण्याची चिन्हे आहेत.
>> सांगली
या मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील पुन्हा निवडणूक लढवू शकतात.
>> सोलापूर
- सोलापूर शहर मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे उमेदवार असू शकतात.
- माढा - या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धवलसिंह मोहिते उमेदवार असू शकतात. प्रभाकर देशमुख यांनाही शरद पवार उमेदवारी देऊ शकतात.